Ahmednagar – फटाक्‍यांची आतषबाजी, शहरे गुदमरली; श्‍वास कोंडला

नगर  -मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही दिवाळीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत फटाकेबाजी सुरु होती. राज्यातील प्रमुख शहरात रात्रीच्या वेळेत हवा प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले आहे, रविवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांची हवा अधीच प्रदूषित आणखी प्रदूषित झाली आहे.

वास्तविक फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असे आव्हान अनेक सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी केले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर शालेय विद्यार्थ्यांना फटाके उडवणार नाही अशी शपथ दिली. न्यायालयानेही रात्री आठ ते दहा असे दोनच दिवस फटाके उडविण्यास परवानगी दिली होती मात्र या सगळ्या आव्हानांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करत मनसोक्त फटाकेबाजी केली.

वास्तविक फटाक्‍यांचे दुष्परिणाम सर्वांना माहीत आहे तरीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरकारच्या आणि सेवाभावी संस्थांच्या आव्हानाला हरताळ फासत सर्वत्र फटाक्‍यांचा बेसुमार धूर काढण्यात आला त्याच्या व्हायचा तो परिणाम झालाच. फटाक्‍यांमुळे अनेक शहरांची रला हवा प्रदूषित झाली. विशेषत मोठ्या शहरातील हवेचे प्रदूषण चिंता वाटावी इतक्‍या गंभीर पातळीवर जाऊ लागले.

केवळ राज्यातीलच नाही तर देशातीलही अनेक शहरात फटाक्‍यांमुळे प्रदूषण वाढले आहे. अर्थात हवा प्रदूषित होण्यास केवळ फटाके हेच एकमेव कारण आहे असे नाही तर वाढती वाहने हे ही एक महत्वाचे कारण यामागे आहे. मात्र दिवाळीत प्रदूषणाची पातळी खूप वाढते है सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.

हवा प्रदूषित झाल्याने शहरांचा जीव गुदमरतोय आणि नागरिकांचा श्वास कोंडला. दिवाळी नंतर अस्थमाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या दूषित हवेचा सर्वाधिक फटका लहानमुले, गरोदर महिला, वृद्ध नागरिक व व्याधीग्रस्त रुग्णांना बसला शिवाय फटाक्‍यांमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या बातम्याही आपण टीव्हीवर पाहिल्या. अनेक मुले फटाक्‍यांमुळे जखमी झाले तर काही ठिकाणी फटाक्‍यांमुळे आग लागून दुर्घटना घडल्या त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, हे सर्व टाळायचे असेल तर किमान पुढील वर्षांपासून तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायला हवी.

सरकारनेही फटाक्‍यांवर बंदी आणायला हवी आणि हो ही बंदी केवळ दिवाळी पुरतीच नको तर कायमस्वरूपी हवी कारण दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळीही फटाके वाजवले जातात. दिवाळीत त्याचे प्रमाण अधिक असते इतकेच कदाचीत त्यामुळेच दिवाळीत फटाक्‍यांचे दुष्परिणाम तीव्रतेने दिसून येतात.