अहमदनगर – चौघा भाविकांवर काळाचा घाला एसटी बस व कारमध्ये अपघात

श्रीगोंदा – एकादशीच्यानिमित्ताने आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी गेलेल्या पारगाव सुद्रिक येथील भक्तांवर काळाने घाला घातला. एसटी बस व एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. एका भाविकाचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्याने ते बालंबाल बचावले. शनिवारी (दि.४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या ढवळगाव परिसरात हा अपघात झाला.

या घटनेत पारगाव येथील पारगाव सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (वय ५५), पारगाव सेवा संस्थेचे सदस्य हरी तुकाराम लडकत (वय ६०), ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके (वय ५५), दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (वय ६०) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक विठ्ठल गणपत ढोले (वय ३६ रा.लोणी व्यंकनाथ), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (वय ७०), रोहिदास सांगळे (वय ७२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दर्शनासाठी गेलेले गोपीनाथ हिरवे हे मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे गेल्याने बालंबाल बचावले.

श्रीगोंदा-शिरूर रोडवरील ढवळगाव परिसरात श्रीगोंदेकडून बेलवंडी मार्गे शिरूर जाणारी एसटी (एमएच १४ बी टी ०८७३) व आळंदी येथून देवदर्शन करून घरी येणारी एर्टिगा कार (एम्एच १२ टी वाय ४३५२) या दोन्ही वाहनांची ढवळगाव परिसरातील कुकडी चारी क्रमांक ३४ च्या वळणावर शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास समोरासमोर भीषण धडक झाली.या धडकेत एर्टिगा कारमधील सात जणांपैकी विश्वनाथ लक्ष्मण ननवरे, हरी तुकाराम लडकत, भाऊसाहेब बापूराव मडके, दत्तात्रय बळीराम खेतमाळीस या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक विठ्ठल गणपत ढोले, रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस, रोहिदास सांगळे हे तिघेजण गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी दवाखान्यात हलविले. घडलेल्या घटनेमुळे पारगाव सुद्रिक गावावर शोककळा पसरली आहे.