अहमदनगर – खासदार लोखंडे यांचा मतदारसंघात विकासकामांचा धुमधडाका

नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांना वाचा फोडून विकास कामांचा धुमधडका सुरू केला आहे. कामदार खासदार म्हणून खासदार लोखंडे यांनी आपल्या मतदारसंघात कामाच्या माध्यमातून एक वेगळा करिष्मा निर्माण केला आहे.

निळवंडे धरणाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. खासदार लोखंडे यांनी घाटमाथ्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात थेट दुसऱ्याच दिवशी आवाज उठवत लोकसभा अध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधत सन २००५ साली झालेल्या समन्यायी पाणी वाटप कायदा अन्यायकारक असल्याचे सांगून पश्चिमेला वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ राज्य सरकारला आदेश देत प्रस्ताव पाठविण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली.

जैनपूर (ता.नेवासा) येथील तीनशे हेक्टर जमीन कापरीनालाच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे येथील जमिनी नापिक झालेल्या होत्या. जैनपूरचे सरपंच व शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशराव डिके यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना या भागाची वास्तव परिस्थिती निदर्शनास आणल्यामुळे खासदार लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून १ कोटी ४९ लाख रुपयाच्या कामाला तत्काळ मंजुरी मिळत कापरीनाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा प्रत्यक्षात शुभारंभ शनिवार (दि.९) सकाळी ११ वाजता खासदार सदाशिव लोखंडे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

या भागातील ज्वलंत व जिव्हाळ्याचा प्रश्न त्यांनी सोडविल्यामुळे सुमारे तीनशे हेक्टर नापिक झालेल्या जमीन सुपिक होणार आहे. खासदार लोखंडे यांनी शिर्डी मतदार संघात काम करतांना नेहमीच विकासात्मक कामांना प्राधान्य दिले आहे.