सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य भाजपात

जामखेड :आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील राष्ट्रवादीच्या महिला सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व इतरांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत शनिवारी जाहीर प्रवेश केला. आमदार शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

जामखेड तालुक्यातील जातेगावचे सरपंचपद गेल्या एक वर्षांपासून रिक्त होते. 21 मार्च रोजी सरपंचपदाची निवडणूक पार पडली होती. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आशालता रामदास गायकवाड यांची सरपंचपदी निवड झाली होती.

सरपंचपदी निवड होऊन दोन दिवस उलटत नाही तोच जातेगावात मोठा राजकीय भूकंप झाला. जातेगावच्या सरपंच आशालता गायकवाड यांनी ग्रामपंचायत सदस्या प्रयागा अंगद गायकवाड, उषा छबू गायकवाड आर्केश गायकवाड व इतरांसह आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यावेळी भाजपा नेते रविंद्र सुरवसे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सोमनाथ पाचरणे, मार्केटचे सभापती शरद कार्ले, तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, प्रशांत शिंदे, सुशिल आव्हाड, राजेंद्र ओमासे, अशोक महारनवर, प्रसिध्दीप्रमुख उध्दव हुलगुंडेसह पदाधिकारी उपस्थित होते.