अहमदनगर – श्रीगोंद्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा…!

श्रीगोंदा – आठवडाभरात तालुक्याला दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. श्रीगोंदा शहरासह तालुक्याच्या काष्टी, बेलवंडी, देवदैठण, उक्कडगाव, पिंप्री कोलंदर, पारगाव सुद्रिक, कोळगाव, चिंभळे, लोणी व्यंकनाथ, वांगदरी आदी भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षासह फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बहुतांश भागात वादळी वाऱ्याने ऊस, कांदा जमीनदोस्त झाला आहे.

दरम्यान, कोळगाव मंडलात सर्वाधिक ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आज (गुरुवार) तहसीलदार हेमंत ढोकले यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी सरपंच पुरुषोत्तम लगड, संतोष मेहेत्रे, विलास शितोळे आदी उपस्थित होते.

आठवडाभरात झालेल्या पावसाची आकडेवारी –
श्रीगोंदा – २८ मिलिमीटर, काष्टी – ७ मिमी, मांडवगण – ३४ मिमी, बेलवंडी – ३५ मिमी, पेडगाव – २० मिमी, चिंभळे – २६ मिमी, देवदैठण – २६ मिमी, कोळगाव – ६४ मिमी.