अहमदनगर – दहा ते बारा एकर जळून खाक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

सोन‌ई –  सोनई जवळील कन्हेर वस्ती येथे तोडणी योग्य असलेला अडसाली दहा ते बारा एकर ऊस जळून खाक झाला. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेतकी विभागाचे ढिसाळ नियोजन असल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा आरोप केला. प्रत्येक वेळेला तोडणी योग्य झालेला ऊस वेळेवर तुटत नसल्याने शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.

यामुळे शेतकरी पूर्णपणे वैतागला आहे. महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारा शेतकऱ्यांच्या ऊस पिकातून गेलेल्या असल्याने व उन्हाळ्यात विजेचा दाब जास्त असल्याने शॉर्टसर्किट होऊन धोका संभवतो. कारखान्याच्या शेतकी विभागाने योग्य नियोजन करून वेळेस ऊस तोडणी करण्याची गरज आहे. योग्य वेळी तोड दिली असती तर आमचे उसाचे क्षेत्र वाचले असते. कन्हेर वस्ती परिसरातील कारभारी गौरव जामदार, दिनकर देवराव जामदार, कचरू जामदार, साहेबराव वांडेकर, बाळासाहेब मच्छिंद्र गडाख, रावसाहेब वासुदेव जामदार यांच्या शेतातील ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.