अहमदनगर : जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचविणार – राधाकृष्ण विखे पाटील

सोन‌ई – मागील नऊ वर्षांच्या काळात केंद्र व राज्य सरकारने ज्या जनहिताच्या योजना राबवल्या त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. आयुष्यमान भारत योजनेत नागरिकांना पाच लाख रुपये आरोग्य विमा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

घोडेगाव येथील सोनई रोडवर श्रीनाथ मंगल कार्यालय येथे आमचा संकल्प विकसित भारत या योजनेचे उद्घाटन विखेपाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जीवन प्राधिकरण डेप्युटी सीईओ शेवाळे, जिल्हा कृषी अधिकारी गुंजाळ, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, नितीन दिनकर, बीडीओ पाटेकरसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले . जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील १३२० गावांमध्ये योजनेचा रथ जाणार आहे. ही योजना २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. कार्यक्रम ठिकाणी आरोग्य विभागाचे वतीने आभा कार्ड, आयुष्यमान भारत योजना माहिती कक्ष उभारला. दहिगाव कृषी विज्ञान केंद्र , एकात्मिक बाल विकास केंद्र, महिला बचतगट, शेतीसाठी ड्रोन असे कक्ष माहितीसाठी तयार केले होते.

रथ धाब्यावर विश्रांतीसाठी नेऊ नका
प्रचाराचे रथ गावात गर्दी असेल तेव्हा न्या. दुपारच्या वेळी रथ धाब्यावर विश्रांती साठी नेऊ नका. योजनेची बदनामी होईल, असे काम करू नका, अशा सूचना विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. प्रचार मोहिमेत नगर जिल्हा राज्यात पहिल्या नंबरवर असावा, अशी आशाही व्यक्त केली.