हवाई दलाला मिळाले पहिले ‘सी-295’ मालवाहू विमान ! 56 पैकी 40 विमानांचे उत्पादन होणार वडोदरामध्ये

नवी दिल्ली – हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी आज स्पेनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सी 0295 या मालवाहू विमानांच्या मालिकेतील पहिले विमान ताब्यात घेतले. भारतीय हवाई दलासाठी अशी 56 विमाने मिळवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एअरबस या कंपनीबरोबर 21,935 कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. या करारातील हे पहिले विमान आज हवाई दलाला मिळाले आहे. हवाई दलाच्या ताफ्यात सध्या असलेल्या अवरो-748 विमानांच्या जागेवर ही मालवाहू विमाने हवाई दलामध्ये सामील होणार आहेत.

एअर चीफ मार्शल चौधरी यांनी स्पेनच्या दक्षिणेकडील सेव्हिल शहरातील एरोस्पेस मेजरच्या उत्पादन सुविधेवर विमानाचा स्वीकार केला. या विमानांच्या एकूण ताफ्यातील 40 विमानांची निर्मिती गुजरातमधील वडोदरा येथे केली जाणार आहे. त्यामुळे हा दिवस हवाई दलासाठी संस्मरणीय असल्याचे हवाई दल प्रमुखांनी म्हटले आहे. यावेळी हवाई दल प्रमुखांनी नवीन विमानातून फेरफटका देखील मारला.

करारानुसार, एअरबस 2025 पर्यंत सेव्हिलमधील अंतिम असेंब्ली लाइनवरून ‘फ्लाय-अवे’ स्थितीत पहिली 16 विमाने वितरित करेल आणि त्यानंतरची 40 विमाने दोन्ही कंपन्यांमधील औद्योगिक भागीदारीचा भाग म्हणून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टीम्सद्वारे भारतात तयार आणि असेंबल केली जातील.

भारताला देण्यात येणारे पहिले विमान 15 सप्टेंबर रोजी स्पेनमधून भारताकडे रवाना केला जाईल. हे विमान त्याच्या वेळापत्रकाच्या वितरणाच्या 10 दिवस अगोदर एअरबसने भारतीय वायुसेनाकडे सुपूर्द केले, असे स्पेनमधील भारताचे राजदूत दिनेश पटनायक म्हणाले यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन मिळेल, असेही पटनाईक म्हणाले.