म्यानमारमधील हवाई हल्ल्यात १७ ठार; लहान मुलांचाही समावेश

Myanmar – म्यानमारच्या लोकशाहीवादी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीमाभागातील गावावर लष्कराच्या विमानांनी आज केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान १७ जण ठार झाले. या हल्ल्यामध्ये ठार झालेल्यांमध्ये ९ लहान मुलांचाही समावेश आहे, असे स्थानिक मानवी हक्कविषयक संघटनेने म्हटले आहे.

भारताच्या सीमेला दक्षिणेकडे लागून असलेल्या खामपात भागातील कनान या खेड्यावर आज सकाळी हा हवाई हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अन्य २० जण जखमी देखील झाले आहेत.

म्यानमारमधील लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये राष्ट्रीय समन्वयक आंग स्यान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करून सत्ता ताब्यात घेतली, तेंव्हापासून लोकशाहीवादी बंडखोरांशी लष्कराचा संघर्ष सुरू आहे.

लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठीचे शांततेच्या मार्गाने झालेले आंदोलन लष्कराने दडपून टाकलल्यावर या बंडखोरांनी सशस्त्र उठाव करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या मोठ्या सीमाभागात अजूनही लष्कराचा या बंडखोर गटांबरोबर संघर्ष सुरू आहे.