Maharashtra Politics : “सध्या जनतेच्याच पैशाने मस्तपैकी…”; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई – जाहिरातींचा खर्च आता 55 कोटी नाही, तर 100 कोटी रुपयांवर जाणार आहे कारण सध्या सत्ताधाऱ्यांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत. लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे, असा थेट हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

सरकारने जर वेगवेगळ्या योजना आणि त्या योजनांबद्दल जाहिरात करून लोकांना जागृत केले असते तर समजू शकतो. आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही अशी जाहिरातबाजी केली नाही. आम्ही निवडून आलो त्यावेळीही जाहिराती केल्या नाहीत, असेही अजित पवार म्हणाले.

धक्कादायक! ‘No Ball’ चा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला; भर मैदानात संतापलेल्या खेळाडूने…

पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नाही, पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि नियमित परतफेड करणार्‍या तमाम शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळायला हवे होते ते काही प्रमाणातच काहींना मिळाले आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये आणि बजेटमध्ये ही रक्कम घेतली आहे. त्यातून मंजूर करून देतील. त्यामुळे अंमलबजावणीसाठी थोडा वेळ सरकारला द्यावा लागेल. थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग आम्ही आमची भूमिका मांडू, असे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.