‘अजित पवार तुमच्या नादी लागून बिघडले…’; जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

Jitendra Awad – अजित पवार हे तुमच्या नादाला लागून बिघडले. तुम्ही तुमच्या बहिणीला व काकाला किती त्रास दिला हा इतिहास महाराष्ट्रात कुणाला माहिती नसेल, पण परळीतील गावोगावी माहिती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोपवला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी या प्रकरणी अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांवर तुफान टीका केली.

तसेच आता अजित पवार गटाला अलिबाबा व ४० चोर असे नाव देणार का? असा खोचक प्रश्नही उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.

त्यात धनंजय मुंडे यांनी बुधवारी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख पवारांच्या घरात आग लावणारा नेता म्हणून केला होता. त्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. मी आग लावण्याचे काम करत नाही.

मी काही चुकीचे केले असते तर शरद पवारांनी तेव्हाच माझा कान पकडला असता. उलट तुमच्या नादाला लागून पुतण्या (अजित पवार) बिघडला. कारण ते तुमच्या रक्तातच होते, असे आव्हाड म्हणाले.

पवारांचे मनगट अजूनही बळकट –

आव्हाड यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नाव व निवडणूक चिन्ह गेल्यामुळे शरद पवारांना कोणताही फरक पडणार नसल्याचा विश्वासही व्यक्त केला. अजित पवार गटाने पाकिटमारासारखे शरद पवारांच्या मनगटावरचे घड्याळ चोरले. पण मनगट अजूनही शरद पवारांकडे आहे.

ते मनगट चाळीशीत व साठीत जेवढे ताकदवान होते, तेवढेच आज ८४ व्या वर्षीही बळकट आहे. शरद पवार संघर्षाला उभे राहतात तेव्हा ते इतिहास घडवतात. आताही पक्षाचे नाव व चिन्ह वेगळे असले तरी ते विजयश्री खेचून आणतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.