अजित पवार म्हणाले,”पितृपक्षामुळे मंत्र्यांनी कार्यभार घेतला नाही”; तर बावनकुळे म्हणाले,”त्यांच्या काळात त्यांचा मुख्यमंत्री…”

मुंबई : राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे,” अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पवारांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकासआघाडीने त्यांच्या सरकारच्या काळात त्यांचा मुख्यमंत्री १८ महिने मंत्रालयात का आला नाही?” असा सवाल बावनकुळेंनी केला.

अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सर्व मंत्र्यांनी आपआपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. मी स्वतः पाहिलं आहे की सर्व मंत्री कामाला लागले आहेत. सत्ताधारी पक्ष जेव्हा विरोधी पक्षात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो. त्यांना आपण सत्तेतून गेलोय हे लक्षातच येत नाही. त्यांनी आधी सांगावं की पहिले १८ महिने तुमचा मुख्यमंत्री मंत्रालयात का आला नाही? त्यांना हे विचारण्याचा अधिकार आहे का? त्यांनी आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात.”

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले,“राज्याचा मुख्यमंत्री १८ महिने फेसबूक लाईव्ह करतो, १८ महिने मंत्रालयात येत नाही. पालकमंत्री म्हणून ज्यांची निवड केली ते जिल्ह्याचे पालकमंत्री न राहता केवळ आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री होतात. त्यांना आमच्या सरकारला हे विचारण्याचा अधिकार नाही. त्यांचं सरकार असताना १८ महिने मंत्रालयात गेले नव्हते हे ते विसरले का? त्यांचे पालकमंत्री झेंडा ते झेंडा होते. ते जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ झेंडावंदनाला यायचे. त्यांनी कधीही आपला जिल्हा म्हणून कामच केलं नाही. त्यांनी आपल्या मतदारसंघापुरतंच काम केलं,” असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

तसेच, “ज्यांनी फार चांगलं काम केलं त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, करोना संसर्गाच्या काळात लोकं मरत असताना त्यांनी १८ महिने महाराष्ट्राचं दर्शन घेतलं नाही. या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आयसीयूत जात होते, धुळे, नंदूरबारमध्ये फिरत होते. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री १८ महिने गायब होते.” “त्यामुळे त्यांना हे विचारण्याचा अधिकारच नाही. विरोधकांच्या ९० टक्के टीका माध्यमांमध्ये बातम्या करण्यासाठी आहेत. त्यांच्या टीकेवर आम्हाला फार लक्ष देण्याची गरज नाही,” असेही त्यांनी नमूद केले.