अजित पवार राष्ट्रवादीचे मुख्यालय ताब्यात घेणार? मुंबईत हालचालींना कमालीचा वेग

Ajit Pawar : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये उत्साह संचारला आहे. त्यानंतर आता या सत्ताधारी गटाने शरद पवारांना आणखी एक धक्का देण्यासाठी पक्षाचे मुख्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटातील वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काही जिल्ह्यांतील पक्ष कार्यालये अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत. तर काही जिल्ह्यांत ते शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ हे मुंबईत आहे.

हे मुख्यालय शरद पवार गटाच्या ताब्यात आहे. आता अजित पवार गटाने पक्षाचे हेच मुख्यालय आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यालये राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टची मालमत्ता असल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. या वेल्फेअर ट्रस्टवर शरद पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कार्यालये शरद पवार यांच्याच ताब्यात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

पण आता अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे मुख्यालय हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे नव्हे तर पक्षाचे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाने हे मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली आहे.