पोलिसांनो सुटलेली पोटं कमी करा – अजित पवारांचा सल्ला

मुंबई – आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. आता काही पोलिसांची पोटं सुटली आहेत. ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करतील असा प्रश्न समोर येतो. मुख्यमंत्री साहेब बघा कसे सडपातळ आहेत. आम्हाला पोलिसांची सुटलेली पोटं कमी करायची आहेत. मी लहानपणापासून पोलिसांना बघत आलोय. पोलिसांचा धाक आणि दरारा वाटला पाहिजे.

पोलीस पहिलवान नको, पण पोलीसच वाटला पाहिजे. पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा. आर्मीतील जवानांसारखा फिटनेस ठेवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पोलिसांच्या 112 हेल्पलाईन आणि सीसीपीडब्ल्यूसी प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते.

महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच पोलिसांना विश्वास दिला आहे. कोविड काळात सक्षमपणे पोलीसांनी काम केलं आहे. डायल 112 साठी वाहन कमी पडतात यासाठी जिल्हा नियोजनमधील निधी दिला जाईल. पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे. मागील सरकारच्या काळात हा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी एवढा वेळ का लागतो याची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मात्र तुमच्या विश्वासाला डाग लागता कामा नये, असे अजित पवार म्हणाले.

हिंदी चित्रपटात दाखवले जात होते तस काही पोलिस अधिकारी वागतात. तसे होता कामा नये. पारदर्शक कारभार असला पाहिजे. दोन नंबरचे धंदे बंद झाले तर कर वाढू शकतो. त्यातून वाढलेला निधी गृह खात्याला देता येईल. एक्‍साईज आणि पोलीस विभाग एकत्र बसून यावर विचार करू. गृहमंत्री यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जर एखादी व्यक्ती चुकीची वाटत असेल तर ती ओळखा आणि आपल्या खात्याची बदनामी टाळा, असे आवाहनही त्यांनी केले.