“अजित पवार यांचे आरोप ही भाजपची स्क्रिप्ट”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या शिबिरातून काल अनेक नेतेमंडळींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले. यावेळी एकीकडे छगन भुजबळांनी मराठा आरक्षण व शरद पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर दिले तर दुसरीकडे गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पक्षातील व्यवस्थेवर भाष्य केले. इतकेच काय तर त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे गौप्यस्फोट केले. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि अजितदादा जे बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना हरवण्यासाठी भाजपचा प्रयत्न करत आहे. चारित्र्य हनन करत आहे. खोटे आरोप, अल कायदा टेरेर्स काम करत होती तसे भाजप करत आहे. भाजपने पक्ष आणि घर फोडली आहेत. आता नेते तुटत नसल्याने चारित्र्यावर हल्ला केला जात आहे. अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला असून त्यांनी त्यापद्धतीने जावं.”

पुढे ते म्हणाले, “सध्या अजितदादा बोलत नाहीत. तर भाजप बोलत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहात आहे. पण तसं होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचं सरकार येईल,”असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

कर्जतमधील भाषणादरम्यामन अजित पवार यांनी बारामतीसह अन्य ठिकाणी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. यावरही संजय राऊत म्हणाले की, “ती अजित पवार यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना संपवण्यासाठी भाजपकडून षड्यंत्र रचलं जात आहे. संघाचं हे कारस्थान आणि कपट आहे,” असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.

“सरकार कुणालाही अटक करेल”

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मला कधीही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरूनही संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “सरकार कुणालाही अटक करेल. कायद्याने अडवता येत नाही, म्हणून व्यक्तिगत हल्ले केले जातात. त्यांच्या समाजासाठी ते काम करत आहे. जरांगे सरकारला धोकादायक वाटतात. जे लोक यांना कायद्याने आवरता येत नाहीत. त्यांना हे अटक करण्याचं अस्त्र उगरतात,”असे संजय राऊत म्हणाले.