अजित पवार यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; जयंत पाटील म्हणाले,“नोशनलिस्ट पार्टीला…”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. नव्या नेमणुका जाहीर करून मूळ राष्ट्रवादी पक्षाला आव्हान देण्यात आले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, “आमची ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी’ आहे. महाराष्ट्रात अलीकडे नवीन झालीय, ती ‘नोशनलिस्ट काँग्रेस पार्टी’ आहे. नोशनल पार्टीने मला निलंबित केलं काय, ठेवलं काय. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे.”  त्यांनी यावेळी म्हटले.

पक्षाला सत्तेत आणून गुरूदक्षिणा दिली, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. याबद्दल विचारल्यावर जयंत पाटील यांनी, “त्यांनी केलेल्या कृतीचं वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय, हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला त्यांच्याबाबत काहीही बोलायचं नाही.” असे म्हणत खोचक टीका यावेळी त्यांनी केली.

दरम्यान, “मी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती केली होती. २०२१ मध्ये पाटील यांना मीच मुदतवाढ दिली होती. याच अधिकारात मी पाटील यांना बदलून तटकरे यांची नियुक्ती करीत आहे,” असे  प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.