कवठे आरोग्य केंद्रात दारूच्या बाटल्यांचा खच

सविंदणे -कवठे येमाई (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य अधिकारी नामदेव पानगे हे आरोग्य केंद्रमध्येच मद्यप्राशन करून तर्रर्र असतात. जुगार खेळत बसतात. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण सलाइनवर आहे, अशी तक्रार पंचायत समितीकडे करण्यात आली असून, गटविकास अधिकाऱ्यांनी यांचा पंचनामा करून तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

प्राथमिक केंद्रात नामदेव पानगे हे कायम नशेत असल्यामुळे रुग्ण येण्यास टाळाटाळ करीत आहेत., असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आवारात दारूच्या बाटल्यांचा खच दिसत आहे. तक्रारदार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांना फोनवरून तक्रार केली. घटनेच्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी विस्तार अधिकारी संजय आव्हाड, अधीक्षक सुधाकर क्षीरसागर हे गेले होते. त्यावेळी आरोग्य अधिकारी पानगे हे आरोग्य केंद्रात नव्हते. सीसीटीव्ही फुटेज काढून अहवाल तयार करून गटविकास अधिकारी शिरूर यांना पाठवला आहे. दरम्यान, नामदेव पानगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आरोग्य अधिकारी नामदेव पानगे हे याच भागातील असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. सामान्य रुग्णांवर उपचार मिळत नाही.

– योगेश लंघे, तक्रारदार


आमच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. ही घटना दुर्देवी आहे. त्या अधिकाऱ्याकडून व्यक्‍तिचा जीवही जाऊ शकतो. मी अहवाल तयार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.
– विजयसिंह नलावडे, गटविकास अधिकारी, शिरुर

Leave a Comment