“डीआरडीओ’च्या सर्व प्रयोगशाळा सुरूच राहतील

अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांचे कर्मचाऱ्यांना आश्‍वासन

पुणे – “देशातील “डीआरडीओ’ची कोणतीही प्रयोगशाळा बंद होणार नाही. उलट जेथे अजूनही जुन्या तंत्रज्ञानाचा वापर होतो तेथे नवीन तंत्रज्ञान आणले जाईल. तसेच एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन प्रयोगशाळांचे विलीनीकरण करत नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देणार,’ अशी माहिती “डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी दिली.

केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याकडून देशभरातील काही प्रयोगशाळा बंद केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नुकतेच “डीआरडीओ’ अध्यक्षांची भेट घेत, चर्चा केली.

या बैठकीत भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे उपाध्यक्ष सादू सिंह, सदस्य मुकेश सिंग आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. बैठकीत संघटनेच्या सदस्यांनी प्रयोगशाळा बंद करण्याच्या प्रस्तावाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली. तसेच प्रयोगशाळांमधील संशोधक वगळता इतर कर्मचाऱ्यांना विविध योजनांचा लाभ तसेच रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशा विविध मागण्या मांडल्या.

यावर डॉ. रेड्डी म्हणाले, “प्रयोगशाळा बंद न करता फक्‍त तेथील काम, तंत्रज्ञानाचे स्वरूप बदलले जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा सवलतीचा विषय हा अर्थ मंत्रालयाकडे प्रस्तावित असून, लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’

Leave a Comment