मविआ सरकारचे चारही उमेदवार निवडून येतील – प्रफुल पटेल

मुंबई – गेली 32 वर्षे महाराष्ट्रातील जनतेच्या आणि पक्षातील नेत्यांच्या आशीर्वादानेच मी राजकारणात सतत कार्यरत आहे. यातून देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामे करण्याची संधी मला मिळाली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी केले.

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी(दि.30 मे) विधान भवन, मुंबई येथे आपला अर्ज सादर केला.  त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची मते आणि महाविकास आघाडी सरकारला मानणाऱ्या इतर अपक्ष सदस्यांची मते यांचा हिशोब केला तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले.

महाविकास आघाडीतील आमदारांना आपले मत देताना ते मत आपल्या पक्ष प्रतोदांना दाखवून करावे लागेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून येतील, याची खात्री असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मित्र पक्षांचे आमदार व अपक्ष आमदारांशी चर्चा केल्यानंतरच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार दिलेला आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

अर्ज सादर करताना प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते.