पुणे जिल्हयात पिकांबरोबरच फळभाज्याही मातीमोल

सोयाबीन, मूग, उडीद पिकांना जबर तडाखा : बाधितांना भरपाई द्या
रांजणी –
गेल्या काही दिवसांच्या पावसाच्या उघडीपीनंतर गणेशोत्सवाच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्‍यात ठीकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्‍यातील खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या महत्त्वाच्या पिकांसह भाजीपाला आणि फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

गणेशोत्सवात पावसाने दमदार हजेरी लावली. ओढे-नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत लागले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे बहुतांशी परिसर जलमय झाला. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या पावसाने फळभाज्यांना सर्वाधिक फटका बसला. तालुक्‍यातील बंधारेदेखील पाण्याने आता तुडुंब भरले आहेत. झालेला पाऊस शेतीपिकांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने हानिकारक ठरला आहे.

झालेला पाऊस हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारक ठरला असून पूर्व भागात वळती येथील शेतकरी नरहरी शिंदे यांच्या कांद्याच्या बराकीत पाणी घुसल्याने संपूर्ण बराकीतील कांदेच पाण्यामध्ये वाहून गेले. शिंदे यांचे लाखोंचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान डिंभे धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे घोडनदीला 5000 क्‍युसेक्‍सने पाणी सोडले.

धरणे ओव्हरफ्लो
कुकडी प्रकल्पाअंतर्गत असणारी येडगाव, डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव -जोगे आणि वडज ही धरणे जवळ जवळ पूर्ण क्षमतेने पाण्याने भरलेली आहेत. एकूणच तालुक्‍यात पावसाचे गेल्या दहा वर्षातील रेकॉर्ड यावर्षी तुटले असून झालेला पाऊस तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाच्या दृष्टीने फायदेशीर ठरला असला तरी पूर्वेकडील भागाला मात्र तो नुकसानीचा ठरला आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याची देखील भीती वर्तवली जाते.