satara | फलटण शहराला होणार पर्यायी वीजपुरवठा

सातारा, (प्रतिनिधी) – गेल्या दहा-बारा वर्षांपासून बंद पडून कालबाह्य झालेली 33 केव्ही सोमंथळी-सुरवडी वीजवाहिनी पुन्हा उर्जित करण्यात महावितरणला यश आले. त्यामुळे फलटण शहर आणि लगतच्या ग्रामीण भागाला पर्यायी वीजपुरवठा होणार आहे.

सोमंथळी, बरड, आसू, वाखरी, टाकळवाडा व सासकल वीज उपकेंद्रांना 132/33/22 केव्ही कोळकी उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. हे उपकेंद्र अतिभारीत झाल्याने अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत भारनियमन करावे लागत होते. परिणामी नागरिकांची गैरसोय होत होती.

ही गैरसोय टाळण्यासाठी फलटणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, सोमंथळीचे शाखा अभियंता शेखर निकम, महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्सचे दत्तात्रय गाडे आणि बी. एस. इलेक्ट्रिकल्सचे बाळासाहेब झगडे यांनी गेल्या 12 वर्षांपासून दुर्लक्षित असलेली 33 केव्ही सोमंथळी-सुरवडी ही 15 किमी अंतरातील वीजवाहिनी पुन्हा सुरू केली.

या वाहिनीला वृक्षवेलींचा विळखा पडला होता. पालखी मार्गाच्या कामात अनेक ठिकाणी भराव टाकल्याने वाहिनीची उंची कमी झाली होती. त्यामुळे अनेक खांब, जुने इन्सुलेटर, आवश्यक तिथे तारा बदलून आणि सैल पडलेले गाळे ओढून वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता अमित बारटक्के, प्रदीप ग्रामोपाध्ये, प्रकाश देवकाते यांनी या कामाची पाहणी केली.