सातारा बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर पर्याय

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचा पुढाकार; पारंगे चौकाजवळ नवीन गेट काढण्याच्या सूचना
सातारा :
बस स्थानक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत अपघातही वाढले होते. यावर खुद्द जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रस्त्यावर उतरत मुख्य बसस्थानक परिसराची पाहणी केली. त्यानंतर मुख्य बसस्थानकातून बाहेर पडण्यासाठी पश्‍चिमेच्या दिशेला असलेल्या पारंगे चौकाजवळ नवीन गेट काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार आहे त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सातारा शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढल्याने प्रशासनाने काही उपाययोजना राबविल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अचानक त्यांनी बसस्थानक परिसरात पाहणी करुन सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, तहसिलदार राजेश जाधव आदी उपस्थित होते.

या पाहणी दरम्यान बसेस स्थानकात येताना व बाहेर जाताना पश्चिमेकडेच दोन्ही गेट असल्याने वाहतूकीची कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बसस्थानकांच्या मागील बाजूला आणखी एक गेट काढण्याची सूचना करुन त्या गेटमधूनच एसटी बसेस बाहेर काढण्याची सूचना केली. त्यामध्ये महाबळेश्‍वर, पाचगणी, मुंबई, पुणे, फलटण या भागात जाणाऱ्या बसेस मागील गेटने बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे बसस्थानकासमोरील वाहतूक कोंडी संपणार आहे. बस स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जितेंद्र दुडी आणि पुढाकार घेतल्याने नागरिक व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

वाढलेले तिकीट दर होणार कमी?
दोन दिवसापूर्वी वाहतूक व्यवस्थेत बदल करताना पोवई नाक्याकडून बस स्थानकात जाणाऱ्या बसेसला भूविकास बँकेकडून वळण घेत पूर्वी बाहेर पडणाऱ्या गेटमधून आत जाण्याच्या निर्णय घेतला होता. महाबळेश्‍वर, पाचगणी, पुणे, मुंबईला जाणाऱ्या बसेस पोवई नाक्यावरुन पारंगे चौकातून जाण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर एस.टी विभागाने बसेसच्या अंतराचा एक टप्पा वाढल्याने तिकिट दर वाढविले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान पारंगे चौकातच बसेस बाहेर पडण्यासाठी गेट काढण्याच्या सूचना केल्याने अंतराचा टप्पा वाचणार असल्याने एस.टी’चे वाढविले तिकिट दर कमी होण्याची शक्यता आहे.