अंबानी स्फोटक प्रकरण : तब्बल 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असून, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह जप्त करण्यात आली. मात्र यासोबतच एक पांढरी इनोव्हा होती. त्या इनोव्हाचे कोडे अजूनही सुटलेले नाही. पांढऱ्या इनोव्हाची माहिती काढताना पोलिसही चक्रावले आहेत. आतापर्यंत तब्बल 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. मात्र, अद्याप हाती काहीच लागलेले नाही.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी (25 फेब्रवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. “मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार 17 फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांकडून पांढऱ्या इनोव्हाबद्दल माहिती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. त्याचबरोबर 30 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले असून, आतापर्यंत त्या पांढऱ्या इनोव्हाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment