अमेरिकेत आर्थिक नियोजनाची कोंडी कायम

मात्र चर्चेतून अद्याप तोडगा नाही
बायडेन आणि मॅक्‍कार्थी यांच्यातील चर्चा सकारात्मक
वॉशिंग्टन –
अमेरिकेत कर्ज मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात अध्यक्ष ज्यो बायडेन आणि संसदेचे सभापती केविन मॅक्‍कार्थी यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे अमेरिकेपुढील संभाव्य आर्थिक संकट टाळण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली जाऊ शकलेली नाही.

संभाव्य आर्थिक आणिबाणी टाळण्यासाठी कर्ज घेण्याची मर्यादा वाढवण्यात यायला हवी, या मुद्यावर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बायडेन यांचे प्रशासन ठाम आहेत. तर रिपब्लिकन पक्षाचे संसदेचे सभापती केविन मॅक्‍कार्थी यांनी त्याला ठाम नकार दिला आहे. सोमवारी बायडेन यांच्याबरोबर कर्ज मर्यादा वाढवण्याच्या मुद्यावरील झालेली चर्चा सकारात्मक फलदायी होती. मात्र कोणतीही तडजोड आतापर्यंत होऊ शकलेली नाही, असे मॅक्कार्थी यांनी सांगितले.

अमेरिकेच्या कर्जाच्या परतफेडीचा निधी 1 जूनपासून घटत जाणार आहे. देशाच्या बिलांची देयके देण्यासाठीही अमेरिकेजवळ निधी शिल्लक राहणार नाही, असे पत्र अर्थ मंत्री जेनेट येलेन यांनी सोमवारी संसदेला उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. यामुळे अमेरिकेवर आर्थिक आणिबाणी ओढवण्याची नामुष्कीची वेळ येण्याची शक्‍यता आहे.

ही आर्थिक आणिबाणी यायला नको, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती आहे. त्यामुळे नक्की काही तोडगा काढला जाईल, अशी आशा बायडेन यांनी व्यक्त केली आहे.