पहाडी समुदायाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणार – अमित शहांची घोषणा

श्रीनगर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून तीन दिवसांच्या काश्‍मीर दौऱ्यावर असून त्यांनी तेथील गुर्जर आणि बकरवाल समुदायासोबतच आता पहाडी समुदायासाठीही शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची घोषणा केली आहे. राजौरी येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की पहाडी समुदायालाही अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण दिले जाणार आहे.

राज्यपालांनी याबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यात गुर्जर, बकरवाल आणि पहाडी या तीन्ही समुदायांच्या आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. ती लवकरच पूर्ण केली जाईल. काश्‍मीरचा विशेष दर्जा अर्थात कलम 370 हटवले गेल्यामुळेच हे शक्‍य होणार असल्याचेही शहांनी नमूद केले. आता राज्यातील अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि पहाडी या सगळ्यांनाच त्यांचे अधिकार मिळणार आहेत. या मुस्लिम बहुल केंद्रशासित प्रदेशात हिंदू अल्पसंख्याक आहेत.

आता जर पहाडी समुदायाला आरक्षण दिले गेले तर देशात कोणत्याही भाषिक समुदायाला दिले गेलेले हे पहिले आरक्षण ठरणार आहे. मात्र तत्पूर्वी केंद्र सरकारला संसदेत आरक्षण विषयक अधिनियमांत दुरूस्ती करावी लागेल. दरम्यान, शहा यांनी रॅलीच्या अगोदर कटरा येथील माता वैष्णादेवी मंदिरात पुजा केली. यावेळी जम्मू काश्‍मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह त्यांच्या समवेत होते.