Amrita Shergil : 61.8 कोटी रुपयांची पेंटिंग… भारतीय चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’साठी विक्रमी बोली

नवी दिल्ली  – जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार अमृता शेरगिल (Amrita Shergil) यांचे 1937 मधील ‘द स्टोरी टेलर’ (The Story Teller) हे पेंटींग 16 सप्टेंबर रोजी 61.8 कोटी रुपयांना विकले गेले. एका भारतीय कलाकाराने मिळवलेल्या सर्वोच्च किंमतीचा हा एक जागतिक विक्रम आहे. ही कलाकृती “सॅफ्रन आर्ट’ इव्हनिंग सेल-मॉडर्न आर्ट’चा भाग होती. या इव्हिंनिंग सेलमध्ये सय्यद हैदर अर्थात एसएच रझा, अकबर पदमसी, मकबूल फिदा हुसेन, एफएन सूझा आणि व्हीएस गायतोंडे यांच्यासह मान्यवर कलाकारांच्या 70 महत्त्वाच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आला होता.

ऑइल-ऑन-कॅनव्हास अर्थात कॅनव्हासवर तैलरंगात चितारण्यात आलेल्या शेरगिल यांच्या या मास्टरपीसने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंडोलच्या लिलावगृहाने नोंदवलेला मागील विक्रम मागे टाकला आहे. त्यावेळी सय्यद हैदर रझा यांचे “गेस्टेशन’ हे पेंटींग 51.75 कोटींना विकले गेले होते.

द ओबेरॉय, नवी दिल्ली येथे “सॅफ्रन आटने आयोजित केलेल्या लिलावात गॅलरीसाठी एकूण 181 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली. विसाव्या शतकातील एक दंतकथा बनून राहिलेल्या अमृता शेर-गिल यांचा वर्ष 1913 मध्ये बुडापेस्ट येथे भारतीय खानदानी वडील आणि हंगेरियन-ज्यू आई यांच्या पोटी जन्म झाला होता. वर्ष 1937 पासून आजवर अमृता शेरगिलच्या कलाकृतींचा 84 वेळा लिलाव झाला आहे. त्यांचा सर्वात जुना लिलाव म्युच्युअलआर्टवरील व्हिलेज ग्रुप आर्टवर्कसाठी नोंदवला गेला होता, जो 1992 च्या सुरुवातीला सोथेबी या इंग्रजी लिलावगृहात विकला गेला होता.

“सॅफ्रन आर्ट’ ऑक्‍शन हाऊसच्या सह-संस्थापक मीनल वझिरानी म्हणाल्या, ‘अमृता शेरगिल यांच्या “द स्टोरी टेलर’ या विशिष्ट पेंटिंगची विक्री हा बाजारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. वास्तविक ही कलाकृती इतकी लक्षणीय आहे की, भारताच्या राष्ट्रीय कला खजिन्यांपैकी एक आहे आणि अशा प्रकारच्या कलाकृती विक्रीसाठी येणे फार दुर्मिळ असते.