अंधश्रद्धेचा कहर; ८ महिन्याच्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याने चटके

अमरावती : ८ महिन्याच्या बाळाच्या पोटावर  १०० चटके दिल्याची धक्कादायक घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आदिवासी भागात घडली आहे. बोरदा गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तांत्रिकाच्या सांगण्यावरून आजारी बाळाच्या पोटावर आई वडिलांनी गरम विळ्याने एक दोन नाही तर तब्ब्ल १०० चटके दिले. एका ८ महिन्याच्या बाळाला अंधश्रद्धेला बळी पडावे लागले आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरदा हे गाव अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेले आहे. गावातील एका जोडप्याचं ८ महिन्यांचं बाळ आजारी होतं. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्या जोडप्यानं आपल्या ८ महिन्यांच्या बाळाला एका मांत्रिकाला दाखवलं. त्या मांत्रिकाने देखील अत्यंत निर्दयी असा उपाय सांगत त्या बाळाच्या पोटावर १०० चटके देण्याचे सांगितले असता बाळाच्या आईवडिलांनी देखील कसलाच विचार न करता त्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याच्या टोकाचे १०० चटके दिले. त्या बाळाला मागील आठ दिवसांपासून खोकला तसेच पॉट फुगत असल्याचा त्रास होत होता. अंधश्रद्धेतून हा अमानुष प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

या बाळाला ग्रामीण रुग्णालयात चुरनी येथे दाखल करुन त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी तांत्रिकासह एकाविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment