‘दमा’ रुग्णांतून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

पुणे – “दमा’च्या यशस्वी नियोजनासाठी “बेरोक जिंदगी’ उपक्रमातून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इन्हेलेशन थेरपी आणि दम्याच्या रुग्णांना समाजात अधिक स्वीकारार्ह बनवण्याचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या फिजिशयन्समध्ये चांगला संवाद निर्माण होऊ शकेल, अशी माहिती चेस्ट फिजिशियन डॉ. हिमांशू पोफळे आणि पेडियाट्रिशियन, चेस्ट फिजिशियन डॉ. शशांक कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पोफळे म्हणाले, दमा आणि इन्हेलेशन थेरपीविषयीचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. इन्हेलेशनच्या माध्यमातून घेतल्यामुळे औषधे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. इन्हेलर्स, स्पेसर्स, रोटाहेलर्स आणि नेब्युलायझर्स या साधनांच्या माध्यमातून औषधे इन्हेल करण्याची अद्ययावत सुविधा निर्माण झाल्यामुळे दम्याचे नियोजन सोपे झाले आहे. मात्र, लक्षणे नाहीत म्हणजे दमा नाही हा समज चुकीचा असून, जरासे बरे वाटू लागले की औषधे थांबवू नये. त्यामुळे आजार बळावतो आणि त्याचे दुष्परिणाम होतात. दम्याला दीर्घकालीन उपचारांची गरज असते. डॉ. शशांक कदम म्हणाले, “बेरोकजिंदगी’ उपक्रमामुळे दम्यावर विजय मिळवता येणार आहे. रुग्णांना त्यांच्याच आजारावर अधिक योग्य पद्धतीने उपचार घेण्यामध्ये स्वत:ला सहभागी करुन घेता येणार आहे.

Leave a Comment