इंजिनियर मजुरी करतो, ही बाब न पटणारी; न्यायालयाचे निरीक्षण

पुणे – इंजिनिअरची पदवी असणारा पती मजुरी करतो ही बाब विश्‍वासार्ह वाटत नाही, असे नमूद करत न्यायालयाने पीडित पत्नीला दरमहा 12 हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश पतीला दिला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा पती सामान्य नोकरी करतो, असे गृहीत धरले तरी त्याला दरमहा 20 ते 25 हजार रुपये पगार मिळतो, असे गृहीत धरून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा निकाल दिला.

अभय आणि आकांक्षा (नावे बदललेली आहेत) यांचा विवाह 2018 ला झाला. पहिली मुलगी झाली म्हणून अभय आणि त्याच्या घरच्यांनी तिचा छळ केला. त्यानंतर दुसऱ्यांदा गरोदर असताना अभय आणि त्याच्या घरच्यांनी मारहाण करून घराच्या बाहेर काढले. दुसरी मुलगी झाल्याने अभय आणि त्याच्या घरचे मला व मुलीला भेटायला आले नाही. तसेच पतीने नांदवण्यास नकार दिला, असे पत्नीने दाखल केलेल्या पोटगीच्या दाव्यात नमूद आहे.

आकांक्षा यांनी स्वतःच्या आणि दोन मुलींसाठी ऍड. सुधीर मुळे, ऍड. भाग्यश्री गुजर- मुळे आणि ऍड. वृषाली नवले यांच्यातर्फे पोटगीचा अर्ज दाखल केला होता. अभय इंजिनिअर आहे. मात्र पत्नी व मुलींना पोटगी मिळू नये, यासाठी त्याने त्याच्या उत्पन्न व दायित्वाच्या शपथपत्रामध्ये तो बांधकाम मजूर असल्याचे नमूद केले आहे, असे ऍड. सुधीर मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

नोकरी अथवा व्यवसाय करून उत्पन्न मिळवू शकतो

इंजिनिअरची पदवी असणारा व्यक्ती काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करून उत्पन्न मिळवतो, असे गृहीत धरण्यास अडचण दिसून येत नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. पत्नी व दोन मुलींसाठी प्रत्येकी 4 हजार रुपये अशी 12 हजार रुपये अंतरिम पोटगी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ते दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत देण्याचा आदेश पतीला दिला आहे.