पुसेसावळीतील घटनेची निष्पक्ष चौकशी करावी

पुसेसावळी – पुसेसावळी (ता. खटाव) येथील घटना निषेधार्ह आहे. राज्य सरकारने या घटनेची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुसेसावळीस भेट दिली. येथे झालेल्या दंगलीतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आ. चव्हाण यांनी त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर या दंगलीतील जखमींची विचारपूस करून गावातील प्रमुख व्यक्‍तींची भेट त्यांनी घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आ. चव्हाण म्हणाले, “ही घटना पूर्वनियोजित आहे की नाही, याचा पूर्ण तपास आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. गावात शांतता राहवी, यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे.”

यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन गावातील प्रमुख व्यक्‍तींबरोबर चर्चा केली. जिल्ह्यासह महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते होऊ दिले जाणार नाही, असा निर्धार चव्हाण यांनी येती ग्रामस्थांशी संवाद साधताना व्यक्त केला. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “”ग्रामस्थांनी बाहेरील व्यक्तींच्या प्रभावात येऊन गावातील वातावरण बिघडवू देऊ नये. तसेच सर्वांनी मिळून मिसळून राहवे. पुसेसावळी शांतताप्रिय गाव आहे. या गावाला क्रांतिवीरांचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या गावातील स्वातंत्र्यसैनिकांनी रक्त सांडले आहे. तसेच पुसेसावळीची बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेपैकी एक आहे.

त्यामुळे या गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे.”त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून माहिती घेतली. सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मंडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणजित देशमुख, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कॉंग्रेसचे कराड उत्तर अध्यक्ष निवासराव थोरात, कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष झाकीर पठाण, फारूक पटवेकर, पुसेसावळीचे सुरेशबापू पाटील, माजी सरपंच दत्तात्रय रुद्रके, सोसायटी चेअरमन रवी कदम, तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद लवळे, माजी सरपंच सुरेश पाटील, मंडल अधिकारी, पोलीस पाटील सुरज दळवी, उपसरपंच विजय कदम आदींसह दोन्ही समाजांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन
पुसेसावळीतील दंगलीत मृत झालेल्या नूरूल शिकलगार याच्या घरी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन त्यांच्या आई, वडील, पत्नीची विचारपूस करून सांत्वन केले.