निर्माता कुलजित पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, रेखाला पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटामध्ये दिला होता ब्रेक

मुंबई – ज्येष्ठ चित्रपट निर्माते कुलजित पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते बराच काळ आजारी होते. शनिवारी (२४ जून) सायंकाळी मुंबईत त्यांचे निधन झाले.  प्रसिद्ध सिनेमा निर्माते कुलजीत पाल यांचं निधन झालं आहे. कुलजीत पाल यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबावर नाही तर, बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते ९० वर्षांचे होते.

कुलजीत पाल यांच्या व्यवस्थापकाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. रविवारी आज दुपारी १२ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक देणारे ते पहिले निर्माते होते.

कुलजीत पालचे व्यवस्थापक संजय बाजपेयी यांनी वृत्त माध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, “कुलजीत जी यांना हृदयविकाराचा झटका आला, तसेच, काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. रविवारी सांताक्रूझ येथे  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय सांताक्रूझ पश्चिम येथील आर्य समाज मंदिरात २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता प्रार्थना सभा होणार आहे.

कुलजीत पाल यांनी ‘अर्थ’, ‘आज’, ‘परमात्मा’, ‘वासना’, ‘दो शिकारी’ आणि ‘आशियाना’ यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांची मुलगी अनुप पाल हिनेही चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आहे. अनुप पाल यांना ‘आज’मध्ये कास्ट करण्यात आले होते. ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी कुलजीत पाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला.