कोरेगावातील पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीचा पुढाकार

कोरेगाव – शहरात तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई जाणवत असून, ती येत्या एक ते दोन दिवसात संपुष्टात येणार आहे. नगरपंचायतीने कठापूर येथील पंपहाऊससाठी नवीन पंप खरेदी केला आहे. त्याची जोडणी केली जात असून, लवकरच पाणी समस्येतून मार्ग काढला जात आहे. कोरेगावला भविष्यात कधीही पाणी टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा समितीचे पदसिध्द सभापती सुनील बर्गे यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाणी टंचाईबाबत सविस्तर माहिती दिली. कृष्णा नदीवर कठापूर येथे असलेल्या पंपहाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, तेथे आता नवीन पंप बसवण्यात आला आहे. शहरातील व ग्रामीण भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने पाणी उपश्यावर आणि वितरणावर मर्यादा येत आहेत. तरी देखील नगरपंचायतीचे प्रशासन आणि पदाधिकारी व नगरसेवक पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहर पूर्णपणे टंचाईमुक्त केले जात असून अमृत दोनमधून पाणी योजनेचे काम सुरु झाले आहे. तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आला असून, त्याबद्दल नगरपंचायतीच्यावतीने दिलगिरी व्यक्त करत असल्याचे स्पष्ट करुन सुनीलदादा बर्गे यांनी नागरिकांना पाण्यासाठी टँकर उपलब्ध करुन दिले जात असल्याचे सांगितले. जेथे-जेथे पाण्याची आवश्यकता आहे, तेथे नगरसेवकांशी संपर्क साधावा, तातडीने पाण्याची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.