‘मदर्स डे’चं औचित्य साधून 1 रुपयांत इडली देणाऱ्या ‘इडली अम्मा’ला आनंद महिंद्रांकडून खास गिफ्ट

मुंबई – इडली अम्मा या नावाने प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूच्या वाडीवेलमपालयम येथील रहिवासी एम. कमलाथल यांना मदर्स डे निमित्त देशातील प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खास गिफ्ट दिलं आहे. या महागाईच्या काळातही केवळ एक रुपयात इडली विकणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी घर दिले आहे.

याबद्दल आनंद महिंद्रा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य सर्व लोकांना आनंद वाटण्यासाठी समर्पित केलं, अशा व्यक्तीला छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मोठा आनंदच असू शकत नाही. गेल्या ३७ वर्षांपासून इडली अम्मा स्थलांतरित आणि गरजूंना फक्त एक रुपयात इडली देत ​​आहेत.

आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओही शेअर केला. व्हिडीओमध्ये इडली आम्मा म्हणतात, महिंद्राचा पुगल हा अधिकारी माझ्या झोपडीत आला होता. ही झोपडी खूपच लहान होती. मी त्याला माझ्यासाठी नवीन घराची विनंती केली होती. याबाबत अधिकाऱ्याने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

व्हिडिओनुसार, इडली अम्माच्या नवीन घरासाठी सर्वप्रथम जमिनीची नोंदणी पूर्ण झाली. त्यानंतर महिंद्रा लाईफस्पेसने घराचा आराखडा तयार केला. भूमीपूजनानंतर घराचे बांधकाम सुरू झाले. त्यानंतर मदर्स डेचं औचित्य साधून इडली अम्मा यांच्याकडे घर सुपूर्द केलं.