…आणि मला आई आठवली

कोणत्याही जीवाच्या जन्मात महत्त्वाची भूमिका कुणाची? नराची की मादीची? या प्रश्‍नावर खल करणं म्हणजे अंड आधी की कोंबडी आधी? या प्रश्‍नावर खल केल्यासारखं आहे. पण स्त्रीनं मुल जन्माला घालणं, त्याला पदराखाली घेणं, त्याला माया लावणं, त्याला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगत त्याच्यावर संस्कार करणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. स्त्री काय किंवा पुरुष काय आपल्या मुलाची सर्वांगीण प्रगती व्हावी, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून धडपडत असतात. ते स्वाभाविक नव्हे तर गरजेचंच आहे. कारण कुणी कितीही नाकारलं तरी आपण आपल्या मुलांकडे भविष्य काळातील आधार म्हणून पाहत असतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रत्येक आईवडिलांना म्हातारपणी त्याच्या मुलांकडून आधार मिळतोच असं नाही. पण रोप लावताना त्याला पाणी घालताना उद्या फळं मिळणार आहेत ही जाणीव प्रत्येकालाच असते ना!

पशु-पक्ष्यांमधली मादी “आई’ म्हणून ज्या रितीने आपल्या पिलांचं संगोपन करते ते पाहिलं की अचंबित व्हायला होतं. झालं काय… गावी माझ्या गड्यांनी कोंबड्या पाळल्या आहेत. कोंबड्या अंड्यांवर बसवल्या. एकवीस दिवस अन्नपाणी, हिंडण फिरणं सोडून कोंबड्या त्या अंड्यावर बसून राहिल्या. हळूहळू अंड्यातून पिलं बाहेर आली. दोन्ही कोंबड्या आपापली पिल्लावळं घेऊन अंगणातून स्वतंत्रपणे हिंडू लागल्या. पिलांवर झडप घालणारा कावळा दिसला की कोंबड्या जीवाच्या आकांतानं त्याच्यावर धावून जायच्या. उन्हातान्हात पिलांना पंखाखाली घेऊन बसायच्या. दोन्ही कोंबड्यांना दुसरीचं पिलू आपल्याजवळ आलेलं खपायचं नाही. आपल्याजवळ येऊन किडूकमिडूक टिपू पहाणाऱ्या दुसरीच्या पिलाला त्या चोच मारून हुसकावून लावायच्या. ते बघितलं, तेव्हा मला शाळेत जाताना “तुझा डबा तूच खा. दुसऱ्याला देऊ नकोस’ हे सांगणारी माझी आई आठवली.

दोघींचे झाप (याला डाले असंही म्हणतात. रात्रीच्या वेळी कोंबड्या झाकून ठेवण्यासाठी त्यांचा वापर करतात) दोन स्वतंत्र ठिकाणी ठेवलेले असायचे. दिवस कलला… सूर्यप्रकाश मंद झाला की दोघी आपापल्या पिलांना घेऊन आपापल्या झापाखाली जायच्या. दुपारच्या वेळी हे झाप भिंतीला लावून तिरके ठेवलेले असतात. खूप ऊन असेल तेव्हा कोंबडी या झापाखाली जाऊन बसते आणि तिच्या मागोमाग तिची पिलेही झापाच्या सावलीत विसावा घ्यायची. एखादं दुसरं चुकार पिलू उन्हात उंडारत राहिलं तर कोंबडी झापाखालून त्याच्यावर लक्ष ठेवून राहायची. “कॉक, कॉक’ करत त्याला झापाच्या सावलीला बोलवायची. ते पाहून उन्हात खेळणाऱ्या मला घरी बोलावणारी माझी आई आठवली.

दिवस श्रावणाचे. रिमझिम पावसाचे. कधीही सर यायची. एक दिवस सकाळपासूनच भूर भूर सुरू होती. चार-सहा मिनिटं पाऊस… तासभर ऊन पडायचं… पुन्हा पाऊस यायचा. असा उन्हा-पावसाचा लपंडाव सुरू होता. दुपारचे बारा एक वाजले होते. मी वाड्यातच बसलो होतो. गारवठलेल्या उन्हातच पावसाची मुळमुळ सुरू होती. मी सहज अंगणात डोकावलं. पावसापासून बचाव व्हावा म्हणून कोंबडी शेजारच्या बंद दारात दबा धरून बसली होती. पिलं मात्र कुठंच दिसत नव्हती. पिलं कुठ गेली? एकही पिलू दिसेना म्हणून मी भांबावून गेलो. कोंबडीच्या जवळ गेलो, तर कोंबडीच्या मानेजवळच्या पिसातून बाहेर डोकावणारं एका पिलाचं लुसलुशीत डोकं मला दिसलं. माझी चाहूल लागल्यामुळे कोंबडीनं थोडी चुळबुळ केली आणि आणखी एक पिलू कोंबडीच्या पोटाखालच्या पिसातून डोकावलं. माझ्या लक्षात आलं की पिलांना पाऊस लागू नये म्हणून कोंबडी सगळ्या पिलांना पंखाखाली घेऊन बसली होती. आठ-दहा पिलांना पंखाखाली सामावून घेताना कोंबडीला अंग किती फुगवावं लागलं असेल? याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ते पाहून ऊन लागू नये म्हणून माझ्यावर पदर धरणारी, मला सर्दी लागू नये म्हणून पावसात चिबं झालेलं माझं डोकं अंगावरच्या साडीच्या पदरानं कोरडं करणारी माझी आई आठवली.

एक दिवस दुपारीचा असाच घरात होतो. नेहमीप्रमाणे कोंबडी पिलांसकट मोकळीच होती. दुपार असली आभाळातले ढग ऊन शोषून घ्यायचे. गारवा जमिनीवर पाठवायचे. मधूनच एकजूट करून सूर्याच्या अंगावर जायचे. क्षणभरासाठी सूर्याला दडवून ठेवायचे. ते वातावरण अनुभवायला मी अंगणात आलो. एक कोंबडी तिच्या पिलांसह उकिरड्यावर दिसली. पण दुसरी कोंबडी मात्र कुठं दिसत नव्हती. मी घराच्या मागे गेलो. कोंबडी निवांत बसली होती. सगळी पिलं तिला बिलगली होती. मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. माझी चाहूल लागताच कोंबडी उठली. जड पावलं टाकत निघाली. तिच्या मागोमाग तिची पिलंही निघाली. मी पाहिलं तर एक पिलू कमी होतं. बहुधा कावळ्यानं उचलून नेलं होतं. त्यामुळे कोंबडी पिलांना घेऊन तिथं शोक करत बसलेली असावी असं मला वाटलं. तिच्या डोळ्यात नसलेले अश्रू मला दिसले. आणि नजरेआड होताच कावरीबावरी होणारी माझी आई मला आठवली.

– विजय शेंडगे

Leave a Comment