पिंपरी | अन् आगंतुक नागराजाचा गृहप्रवेश थोडक्यात हुकला

पिंपरी, (प्रतिनिधी) – उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी नागराजाने दरवाजातून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र, घरात उपस्थित तरुणीने प्रसंगावधान दाखवत वडीलांना सावध करून आगंतुक नागराजाची कल्पना दिली. मात्र आवाजाने सावध झालेल्या नागाने दरवाजाजवळील वॉशिंग मशिनचा आसरा घेतला. ही संधी साधत सर्पमित्राला बोलविल्याने त्याने हा सहा फुट लांबीचा विषारी नाग पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला.त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

उन्हाच्या तडाख्यात अंगाची काहीली होत असताना प्राणी,पक्षीदेखील त्यापासून सुटू शकलेले नाहीत. चिखलीत देहू – आळंदी रस्त्यानजीकच्या चिंतामणीनगरमधील बुद्धविहारामागे प्रकाश गायकवाड हे शुक्रवारी (दि.26) दुपारी साडे तीनच्या सुमारास घरात वामकुक्षी घेत होते.

काही अंतरावर बसलेली त्यांची मुलगी प्रमिला वाघमारे यांना घराच्या दरवाजातून फणा काढून नाग घरात प्रवेश करताना दिसला. तत्काळ त्यांनी वडीलांना याची कल्पना दिली. मात्र या चर्चेच्या आवाजाने सावध झालेल्या नागराजाने आपला मोर्चा दरवाजाजवळ ठेवलेल्या वॉशिंग मशिनकडे वळविला.

ही संधी मिळताच स्थानिक सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. त्याने मोठ्या शिताफीने वॉशिंग मशिनमध्ये लपलेला सहा फुट लांबीचा इंडीयन कोब्रा या विषारी नागाला पकडून अधिवासात सोडले. याठिकाणी असलेल्या नाल्यामुळे या भागात सरपटणार्‍या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे दिवसा व रात्रीदेखील नागरिकांनी ये-जा करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.