Andhra Pradesh: लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू

हैदराबाद – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू जम्मू काश्‍मीर आणि लडाखपासून कन्याकुमारी पर्यंत वातावरण तापले आहे. दिल्लीतील सत्ता कोणाच्या हाती येणार याचे अंदाज वर्तवले जात असतानाच चार राज्यांत विधानसभा निवडणुकाही ( Vidhan Sabha elections 2024) होत आहेत. या राज्यांत आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम आणि अरूणाचल प्रदेशचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशात दोन्ही निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. राज्यात विधानसभेच्या १७५ जागा आहेत. निवडणूक लढण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २६ तारखेला छाननी होईल आणि २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.

११ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील आणि १३ मे रोजी मतदान होईल. लोकसभेच्या २५ जागा आहेत व त्यासाठीही १३ मे रोजीच मतदान होईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच विधानसभा निवडणुकांचे निकालही जाहीर केले जातील. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय ४ जून रोजी जाहीर होईल.