Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक मोठा झटका ;मराठा आरक्षणावरून आणखी एका खासदाराचा राजीनामा

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकतेच खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या कारणातून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामे दिल्याने एकनाथ शिंदेंच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. त्यातच आता हेमंत गोडसे यांनी राजीमाना दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची मागणी आहे की, त्यांना आरक्षण मिळावं. यासाठी अनेकदा लाखोंच्या संख्येने मोर्चेदेखील निघाले.

आजही सर्व मराठी समाजाच्या युवकांच्या भावना आहेत की, आम्हाला आरक्षण मिळालं तर खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळेल. काही वर्षांपूर्वीचा मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, असा अहवाल असला तरी आज पुन्हा सर्वेक्षण केलं तर मला विश्वास आहे, मराठा समाज मागासलेला आहे, हे निष्पन्न होईल.” असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी, “या अगोदर मराठा समाजाच्या शेतकरी वर्गाकडे शेकडो एकर जमिनी होत्या. आज बघितलं तर कुणाकडे एक एकर तर कुणाकडे दोन एकर जमीन आहे. राज्यात अल्प भूदारक शेतकरी अधिकाधिक वाढत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर मुलांना नोकरीसाठी आटापिटा करावा लागत आहे. शिक्षणासाठीही पैसे द्यावे लागतात. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत म्हणून मी एक लोकसभा सदस्य म्हणून आणि आपली जबाबदारी म्हणून मी राजीनामा देत आहे”, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली.