रूपगंध : जाळीदार टोपीत राजकुमारी

तिला मी लॉकडाऊनच्या काळात प्रथमच पाहिलं होतं. ती असेल का समाधानी हा प्रश्‍न तसा पडलाच नव्हता. करोना नावाचा एक व्हायरस सगळ्या जगात थैमान घालत होता…सात महिने संपले होते…माणसं त्याच्या सोबत जगायला शिकत होती. भीतीचं सावट होतंच. जिवंत राहणं हेच महत्त्वाचं होतं. हा 2020 चा सप्टेंबर माहिना सुरू होता. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिने उलटून गेले होते.
तिच्याकडे चार भिंती नव्हत्या. तरीही ती जिवंत होती.

औरंगाबाद शहरापासून साधारण चार-पाच किलोमीटर दूर मोठ्या हायवेच्या एका रस्त्याच्या कडेला ती नियमित दिसायची. कधी तिथेच रस्त्याच्या कडेला अंघोळ करताना, कधी छत्री घेऊन, कधी कुठल्या उकिरड्यावरून गोळा केलेल्या सामानाची मळकटलेली, जागोजाग फाटलेली पिशवी घेऊन, जुनाट झालेला एक चमकदार गाऊन घालून, हातातील ती पिशवी खांद्यावर टाकून, केसांना एक रिबीन बांधून… डोक्‍यावर जाळीदार विदेशी टोपी आणि चेहऱ्यावर काहीतरी मिळाल्याचं हसू सांभाळून सामानाच्या शोधात रस्ताभर फिरताना ती रोजच दिसायची. तिला काहीतरी कळत होतं म्हणून ती खूश होती की तिच्या समाधानाच्या कक्षा वेगळ्या होत्या का काही कळण्या-समजण्याच्या ती पल्याड पोचली होती?

खरेतर ती या जगाच्या पलीकडील जगात होती. तो तिच्या जगाचा कप्पा होता. जादूई चित्रपटात दाखवतात तसा एक दरवाजा तिच्या आणि या जगात होता. या आलीकडील दुनियेत ती दिसत होती. वावरत होती. या दुनियेतून ती स्पष्ट दिसायची. ती याच दुनियेचा एक भाग होती. इथल्याच जगातील उकीरड्यातून ती वस्तू वेचायची. पण ती एकावेगळया दुनियेचा भाग होती. तिला दुनियेतील लोक दिसायचे का नाही कोणास ठाऊक? ती मात्र एकटीच या संपूर्ण विश्‍वाची मजा घेत मनसोक्‍त मुशाफिरी करायची.

तिला चार भिंती नव्हत्या. ना पुन्हा पुन्हा हात धुण्याचा उपद्‌व्याप होता. तिचं पार्टीशन वेगळं होतं. तिच्या चार भिंती वेगळ्या होत्या. बरीच शोधाशोध केल्यानंतर तिला लाकडी खाटेचा एक सांगाडा भेटला होता. त्याला ती चारभिंती समजू लागली होती. खाटेची एक बाजू झाडाच्या बुंध्याला तिरपी लावून तिने फाटक्‍या कापडांचे आणि मेणकापडांचे थर रचले होते. त्या खाली तिची पिशवी सुरक्षित होती आणि काहीच अंशी ती ही!

मूळ रंग जवळ जवळ नाहीसा झालेली गोधडी त्याखाली अंथरलेली होती. तिथेच ती फिरायची, राहायची, जागायची, झोपायची. या दरम्यान पाऊस बेभान कोसळत होता. लॉकडाऊनमुळे प्रदूषणमुक्‍त झालेली धरती तृप्त होत होती. असा सततचा पाऊस कैक वर्षांपूर्वी पडायचा असं जुनी माणसं सांगू लागली होती. मोकळ्या आकाशात अचानक ढग भरून येत होते. अंधारून येत होतं आणि कोसळत होता मोठा धो धो पाऊस. क्षणार्धात रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. अंघोळीला आडोसा असण्याचा जिथे कोणताच संबंध नव्हता. एक गोष्ट मात्र होती की करोनापेक्षा वाईट असणाऱ्या या दुनियेतील नजरा तिच्यावर पडतही असतील, पण त्यांच्या इन्फेक्‍शनची तिला भीती नव्हती. या दुनियेतील माणसांकडून हा विषाणू संपेपर्यंत तरी तिला धोका नव्हता.

या अर्थाने तर ती एका काचेच्या पलीकडे जगणारी दुसऱ्या दुनियेचीच होती. कितीही उन्हं असो, पाऊस असो, भयान सुनसान रात्र असो ती तिथेच राहायची. नेमाने जंगलात वा बागेत जाऊन फुले तोडून आणावे या ऊत्साहाने ती रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या कचऱ्यातून, उकिरड्यातून हव्या असणाऱ्या वस्तू गोळा करायची. हजारो लाखोच्या संख्येने लोक इन्फेक्‍टेड होत असताना ती अजूनही कोविड पॉझिटिव्ह नव्हती. पण जगण्यातील पॉझिटिव्हिटी जगत होती. डोक्‍यावर गोल, जाळीदार, परदेशी रिबीन गुंडाळलेली टोपी घालून थाटात फिरणारी ती एक मुक्‍त स्वयंघोषित राजकुमारीच होती…

– डॉ. श्‍वेतांबरी कनकदंडे