रूपगंध : वडीलधारे

1964 सालाची नारायणपेठ आणि त्यातला कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबांना सामावून घेणारा वाडा. काही घरं दोनवेळचं जेवायला मिळावं इतकीच अपेक्षा ठेवणारी तर काही घरं महिनाअखेरीला बॅंकेत जायला लागू नये म्हणून रद्दी बाहेर काढणारी.

एकंदरीत अभावाचं जगणारं एक कुटुंब, ज्यात आयुष्यात कधी सुखाची व्याख्याच करायला न मिळालेल्या अक्का. वय असेल साठ, एका बाजूचा पाय आणि डोळा बालपणापासून अधू. तरीही लग्न झालं. नवरा कसा असेल हे सांगायची गरज नाही. किडूकमिडूक भिक्षुकी आणि पोटार्थी श्राद्ध पक्ष. मुलं सहा, ही एकमेव श्रीमंती. विधवा अक्का कुणाकुणाकडं स्वयंपाकपाणी करून गुजराण करतायत. स्वभाव असा की वाड्यात कुणाकडंही आलेला पाहुणा अक्कांच्या घरात डोकावल्याखेरीज पुढं जायचा नाही. अक्कांच्या घरात वाटीभर दूध आणि अर्धाली वाटी चहा साखर असली तर तोंडभरून स्वागताचा मानकरी होई.

वाड्यासमोर एका धनिकाचं घर, ज्यांच्याकडं अक्का पोळ्या करायला जायच्या. अक्कांचा स्वभाव आणि करणं पाहून घरातील वहिनी समाधानी. जवळपास सहा महिने अक्का त्या घरात रुळल्या होत्या. एक दिवस त्यांच्या पोळ्या करून झाल्या आणि अक्का निघाल्या. वहिनींनी पाहिलं की आक्कांनी ओच्यात काहीतरी ठेवलंय. त्यांनी अक्कांना हटकलं. ओच्यातून दोन पोळ्या निघाल्या. अक्का कावऱ्याबावऱ्या झाल्या. वहिनींनी त्यांचा हात हाती घेत म्हटलं, “अक्का यापुढं असं चालणार नाही. मला तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. तुम्ही सांगून चार दोन पोळ्या नेल्यात तर आम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्ही निःसंकोचपणे सांगून पोळ्या नेत चला. जोवर तुमचे हात पाय चालतायत तोवर तुम्ही आमच्याकडं येत राहा.’

वाड्यातील सारी मुलं अक्कांच्या अवतीभोवती असायची. परीक्षेत चांगलं यश मिळालं म्हणजे अक्कांचा तोंडावरून हात फिरण्यासाठी आसुसलेली असायची. त्यातलाच तो लहानगा आठ-नऊ वर्षाचा. एका त्यातल्या त्यात बऱ्या घरचा. अक्कांनी त्याच्या हातावर आठ दहा आणे ठेवायचे आणि म्हणायचं, “बबड्या शेजारच्या वाण्याकडून चार चार आण्याची चहा पावडर आणि साखर आणून देशील?’ अक्काचं काम करायला आसुसलेला तो उड्या मारत जायचा.

त्याचे वडील वाण्याच्या दुकानात गेल्या महिन्याचं बिल द्यायला आणि पुढची यादी टाकायला गेले. वाण्यानी दोनशे पाच रुपये जमा करून घेताना म्हटलं, “साहेब, अनेक दिवस मला एक प्रश्‍न पडलाय. तुमच्या वाड्यातल्या कुणापेक्षाही तुमचं बिल बरंच जास्त असतं आणि ते इतरांसारखं कधीच थकत नाही. पण तरीही तुमचा मुलगा काही आण्याची चहा पावडर आणि साखर पैसे देऊन का घेऊन जात असतो?’
मुलाचे वडील अनेक प्रश्‍न घेऊन घरात येतात. पत्नीला विचारतात की आपल्या छोट्या डब्यातून सुटे पैसे जातात का? पत्नीचा ठाम नकार ऐकून अधिकच अस्वस्थ होतात. मुलाला पुढ्यात उभं करून प्रश्‍नांची फैर झाडतात. मुलगा निरागसपणे अक्काचं नाव सांगतो आणि खेळायला जातो.

चवली पावलीचं वाणसामान मागायला आणि ओशाळवाणं व्हायला लागू नये म्हणून त्याला दुकानात धाडणाऱ्या अक्का हल्ली आपल्याला दुकानात का पाठवत नाहीत हे कोडं त्याला पडतच, पण त्यापेक्षाही वर्गात पहिल्या पाचात नंबर काढूनही अक्का आपल्या तोंडावरून हात का फिरवत नाहीत हा यक्षप्रश्‍न त्याला पडतो. हाच मुलगा नववीत जातो. एक दिवस वर्गात शिक्षकांच्या बरोबर एक मोठी पेटी घेऊन एकजण येतात. पेटीमधली पुस्तकं सगळ्या मुलांना वाटतात आणि म्हणतात, “मुलांनो आत्ता जे पुस्तक तुम्हाला दिलंय ते तुम्ही पूर्ण वाचून काढायचं आहे. पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला एक प्रश्‍नपत्रिका देईन, ज्यामध्ये या पुस्तकावर काही प्रश्‍न असतील. परीक्षेला बसल्याप्रमाणे तुम्ही हा पेपर सोडवायचा आहे. उत्तम प्रकारे यश मिळवणाऱ्या मुलांचे तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीस दिलं जाईल.’

मुलगा अधाशीपणे पुस्तक वाचून काढतो. हिरिरीने प्रश्‍नपत्रिका सोडवतो. यावर पंधरा दिवस, महिना जातो. ही परीक्षा तो विसरून गेलेला असताना सहा महिन्यांनी शिक्षक वर्गात जाहीर करतात की त्या परीक्षेचा निर्णय लागलेला आहे. त्याच विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक येतो.
शाळेतून घरी परत जाताना त्याचा चेहरा फुललेला असतो. दुसऱ्या दिवशी तो ऐटीत शाळेत येतो. वर्गशिक्षक त्याला बोलावून सांगतात, “बाळ तुझा पहिला क्रमांक आला म्हणून बारा आणे बक्षीस तुला देण्यात येणार आहे.’ हा घरी बारा आण्याचं बक्षीस मिळाल्याचं आई, बाबा, आजी सगळ्यांना खुशीत सांगतो.

दुसऱ्या दिवशी शिक्षक एक रुपयाची नोट काढून त्याला देताना म्हणतात, “हा रुपया घेऊन जा आणि जास्तीचे चार आणे उद्या परत करायला घेऊन ये.’ मुलगा जपून पैसे खिशात ठेवतो. दुपारची डबा खायची सुट्टी होते. याच्या डोक्‍यात एकच विचार, सरांना चार आणे परत करायचेत. त्याच्या डोक्‍यात चार आणे घुसून बसलेले. विचार एकच चार आण्यांचा. तो काहीतरी सुचून शाळेच्या कॅंटीनमध्ये जातो. फळ्यावरची अक्षरं वाचतो- “बटाटेवडा सात पैसे.’ कॅन्टीनच्या बाईंना तो म्हणतो, “काकू मला एक वडा द्या. पण माझ्याकडं सुटे पैसे नाहीत, एक रुपयाची नोट आहे.’ काकू हसून त्याला वडा देऊन त्र्याऐंशी पैसे परत देतात.

तो घाईघाईनी वडा खातो आणि वर्गात जातो. शिक्षकांना चार आणे परत देतो. शिक्षक म्हणतात, “अरे इतकी घाई करायचं काही कारण नव्हतं. उद्या दिले असतेस तरी चाललं असतं.’ तो घरी येतो आणि वडिलांच्या हातावर अडुसष्ठ पैसे ठेवतो. वडील म्हणतात, “हे काय अडुसष्ठ पैसे? तुला बारा आण्याचं बक्षीस मिळालं म्हणाला होतास ना?’

मुलगा झाल्या गोष्टीचा खुलासा करत निरागसपणे वडा खाल्ल्याचं सांगतो. त्याक्षणी वडिलांकडून त्याच्या मुस्काटात बसते. आजी त्याला जवळ घेत असताना वडील तिचा हात झिडकारत म्हणतात, “नाही याला पहिल्यांदा स्वतःचे पैसे मिळाले तर लगेच त्याचा वडा खाल्ला. आठदहा वर्षांनी नोकरीला लागल्यावर काय करील?’ मुलाने गाल न चोळता निश्‍चय केला मी माझ्या पुढच्या आयुष्यात बटाटेवडा हा विषयच कधी डोक्‍यात आणणार नाही.

दीपक पारखी