पुणे जिल्हा | अर्ज 320, आता माघारीकडे लक्ष

सोरतापवाडी, {सचिन सुंबे} – थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 27 फेब्रुवारी असून इच्छुकांच्या नजरा आता या दिवसाकडे लागल्या आहेत.

एप्रिल 2023 मध्ये झालेल्या कारखान्यावरील विशेष सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा ठराव पास झाला. त्यानंतर 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणूकीची घोषणा प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा जिल्हा सहकारी निवडणूक आधिकारी निलिमा गायकवाड व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली.

त्यानंतर हवेली तालुक्यात एकदम निवडणुकीचे वातावरण तयार होऊन 320 एवढे प्रचंड उमेदवारी अर्ज आले. कारखान्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज आल्यामुळे हवेली तालुका हा निवडणूकमय झाला. त्यानंतर माजी संचालक व हवेलीतील ज्येष्ठ पुढार्‍यांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी बैठका घेतल्या. तरुणांना व उमेदवारी अर्ज भरणार्‍यांना निवडणूक बिनविरोध करून असे सांगितले.

नुकतीच एका कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेत बरीच उलथापालथ झाली. त्यानंतर प्रत्येक गटात गटात बैठका घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे सांगण्यात आले. पण काही तरुण उमेदवारांनी आम्ही आजच आमचा माघारीचा अर्ज देतो. पण तो द्यायचा कुणाकडे ज्या मंडळींनी यशवंत कारखान्याला तळागाळात घातले त्यांच्याकडे द्यायचा का, असा प्रश्न विचारला गेला.

कोअर कमिटीमधील घेतलेल्या नावात तरुणांना डावलण्यात आले. ज्यांनी कारखान्याला या परिस्थितीत ढकलले त्यांची नावे घेतल्यामुळे नावावरूनच विरोध दर्शवला गेला. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर नावात दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक गटागटात बैठका होऊ लागल्या असून उमेदवार कोण याविषयी उत्सुकता वाढली आहे.

दोन-तीन पॅनलची शक्यता
हवेली तालुक्यात सर्वांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून प्रत्येक गटात इच्छुक उमेदवारांनी राजकीय आखाडे बांधण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ मंडळींचे दोन पॅनल पडण्याची शक्यता आहे. तसे त्यांचे उमेदवार फिक्स झाले असून माघार घेण्यासाठी साम-दाम-दंड वापरत असल्याची चर्चा हवेली तालुक्यातील सभासदांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे येणार्‍या 27 फेब्रुवारीला अर्ज माघार घेण्याच्या दिवसाकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध झाली नाही तर दोन ते तीन पॅनल होणार असल्याची चर्चा हवेली तालुक्यात सुरू आहे.

आज हवेली तालुक्यातील ज्येष्ठ नेते म्हणणारे नेते यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कसल्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली नाही. 30 ते 40 वर्षांपासून तालुक्याचे स्वतःला नेते मानणारे पुढारी यांनी शेतकरी व कामगारांना फसविण्याचे काम केले. सध्या निवडणुकीमुळे ही सर्व मंडळी एकत्र काम करत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असून यांना कारखाना चालू करणे हा मुद्दा नसून कारखान्याच्या जमिनीवर सर्वांचा डोळा आहे.

त्यामुळे तरुण उमेदवारांनी निस्वार्थीपणे पुढे येण्याची गरज आहे. सर्व सभासदांनी तरुण वर्गाच्या पाठीमागे उभे राहून जो उमेदवार कारखान्याची एक इंच सुद्धा जमीन न विकता कारखाना चालू करण्याचे ठोस पावले उचलेल. त्याला सभासदांनी निवडून द्यावे. -योगेश काळभोर, सरपंच लोणी काळभोर