केसनंद येथे लसीकरण मोहिमेसाठी जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करा – सरपंच नितीन गावडे

वाघोली –  पुणे शहरालगतच्या गावांमध्ये केसनंद गावाचा समावेश होत असून या गावची लोकसंख्या जवळपास 40 हजार च्या वर गेली असून लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या गावासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त लस केसनंद व परिसरातील गावांसाठी उपलब्ध करून देण्याची व हे लसीकरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जास्तीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच नितीन गावडे यांनी केली आहे.

याबाबत सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले की  केसनंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मांजरी, कोलवडी, साष्टे, आव्हाळवाडी, आदी भागातील उपकेंद्रे जोडली असून या सर्व भागातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र म्हणून केसनंद  चे लसीकरण केंद्र ओळखले जात असून केसनंद मध्ये काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गाकडून अतिशय उत्तम सेवा दिली जात असून आलेल्या नागरिकांना रांगेत उभे करून त्यांचे लसीकरण शासनाच्या नियमानुसार होत आहे.

आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गाकडून केसनंद उपकेंद्रात दिली जाणारी सेवा कौतुकास्पद असताना ग्रामपंचायत केसनंद यांच्यावतीने देखील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तीन ते चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नागरिकांना सहकार्य केले जात आहे.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून व परिसरातील लसीकरण प्रभावीपणे  होण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून संयुक्तिक पणे कामकाज केले जात आहे . जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर जास्तीत जास्त लस व जास्तीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केसनंद ग्रामपंचायत सरपंच नितीन गावडे यांनी केली आहे