आठवड्यात 19 कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती

प्रत्येक कामासाठी सल्लागार

प्रभाग क्रमांक 31 व 32 मधील दोन रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी आठ सल्लागार
भोसरीतील सखुबाई गार्डन ते दिघी रस्त्यांसाठी सल्लागार
नाल्यातील अशुद्ध पाण्यावर अद्ययावत यंत्रणेद्वारे प्लांट बसविणे
सीएसआर उपक्रम राबविण्यासाठी मानधनावर सल्लागार

पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. एकीकडे महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असतानाही किरकोळ कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे पेव फुटले आहे. महापालिकेत सल्लागारांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून या सल्लागारांवर प्रकल्प रकमेच्या सव्वा ते तीन टक्के रुपयांची उधळपट्टी केली जाते. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेत तबब्ल 19 कामांसाठी सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वेगाने विकास झाला. प्रशासनाने विकासाच्या नावाखाली विविध खासगी संस्थांना पालिकेत आवतन देत, सल्लागार नियुक्तीची परंपरा सुरू केली आहे. रस्ते, कचरा, पाणी, शिक्षण, मालमत्ता, पार्किंग इत्यादी कोणत्या ना कोणत्या कामांसाठी सल्लागार नियुक्त केले जात आहेत. महापालिकेकडे सक्षम अधिकारी व अभियंत्यांची फौज असतानाही सध्या पालिकेचा भरवसा मात्र सल्लागार संस्थांवर वाढला आहे. छोट्यात छोटी कामेदेखील सल्लागाराच्या सल्ल्‌याशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

सल्लागार नेमताना यापूर्वी राजकीय पक्षांकडून जोरदार विरोध होत असे, परंतु आता सल्लागारांसाठी अक्षरश: पायघड्या घातल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळा पाडून नवीन शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी किमया असोसिएटस्‌ आर्किटेक्‍ट ऍण्ड प्लॅनर्स यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास मान्यता दिली. त्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 1.99 टक्के इतके शुल्क अदा करण्यात येणार आहे.

फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात येणार असून त्यासाठीही किमया असोसिएटस्‌ यांच्याकडून सल्ला घेतला जाणार आहे. या कामासाठीही त्यांना एकूण खर्चाच्या 1.99 टक्के शुल्क अदा केले जाणार आहे. याशिवाय फुगेवाडी येथे स्मशानभूमी विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी मेसर्स शिल्पी आर्किटेक्‍ट ऍण्ड प्लॅनर्स यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात केली जाणार आहे.

सत्ताधारी भाजप उठसूठ खासगी सल्लागार नेमून पालिकेच्या पैशांची अनाठाई उधळपट्टी करीत आहे. स्थायी समितीच्या प्रत्येक सभेत 5 ते 10 सल्लागार नेमण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांना कमी करून त्यांच्या जागी खासगी सल्लागार नेमावेत.

– नाना काटे, विरोधी पक्षनेते, महापालिका.

Leave a Comment