पिंपरी | लोणावळा महाविद्यालय विकास समिती सदस्यपदी पाळेकर यांची नियुक्ती

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस.एस.जी.जी. गुप्ता वाणिज्य, एस. एस. ए. एम. विज्ञान महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समिती सदस्यपदी नेहा राहुल पाळेकर यांची उद्योजक गटातून नियुक्ती करण्यात आली आहे.

नेहा पाळेकर यांनी परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे; तसेच त्या उद्योजिका आहेत. अनेक शिक्षण संस्थामध्ये संचालक, महाविद्यालय विकास समिती सदस्य व अंतर्गत तक्रार समिती सदस्य अशा पदांवर कामकाज पाहतात. लोणावळा एज्युकेशनच्या सचिव अॅड. नीलिमा खिरे यांनी नवनियुक्त महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या नेहा पाळेकर यांचे पुष्पगुच्छ स्वागत केले व त्यांस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, दत्तात्रय येवले, नंदकुमार वाळंज, शैला फासे, सुनील ठोंबरे, अॅड. अजय भोईर, समिती सदस्य विशाल पाडाळे, उद्योजक राहुल पाळेकर, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा वापर करून मला लोणावळा शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील लोणावळा महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासास हातभार लावण्याची संधी मिळाली असल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.