पुणे | एनबीटी’वर राजेश पांडे यांची नियुक्‍ती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) बोर्ड ऑफ ट्रस्टवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राजेश पांडे यांचा समावेश आहे. भारत सरकारने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या सन २०२४ साठी १४ सदस्यांची बोर्ड ऑफ ट्रस्टची नावे जाहीर केली.

यामध्ये महाराष्ट्रातून भाजपा नेते तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांचा समावेश आहे. देशासह जगभरात ओळख असणाऱ्या आणि वर्ल्ड बुक फेअरसारख्या महोत्सवांचा माध्यमातून जगभरातील साहित्य विश्वाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाशी जोडले जाण्याची संधी यानिमित्ताने पांडे यांना मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत १९५७ मध्ये वाचनाचा प्रचार- प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय पुस्तक न्यास ही संस्था आहे. या संस्थेसोबत पुण्यामध्ये राजेश पांडे यांनी आयोजित केलेला ‘पुणे पुस्तक महोत्सव’ हा यशस्वी महोत्सव ठरला होता.

या महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे विश्वविक्रमही करण्यात आले होते. संस्कृती रुजविण्यासाठी पुण्यासह साहित्य संमेलनात देखील या महोत्सवाचा महत्त्वाचा वाटा राहिला होता. या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची ठरते.

नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) बोर्ड ऑफ ट्रस्टमध्ये अधिकाधिक इनोव्हेटिव्ह योगदान देण्याचा प्रयत्न असेल. महाराष्ट्राचा, पुण्याचाही नावलौकिक, तसेच पुण्याचा पुस्तक महोत्सव देखील जागतिक पातळीवर नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. महाराष्ट्राच्या साहित्यिक लँडस्केपसाठी अधिक संधी शोधून काढण्याची आणि पुणे पुस्तक महोत्सवाचा विस्तार करण्याची ही एक उत्तम संधी आहे.- राजेश पांडे