लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी विश्वजित काईगडे यांची नियुक्ती

वाघोली (प्रतिनिधी) – पुणे शहर आयुक्तालयात समाविष्ट झालेल्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दि. २० रोजी दिले आहेत. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांची नुकतीच बदली झाली होती. या ठिकाणी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयात पोलीस ठाणे गेल्यापासून नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. वाघोली ची लोकसंख्या जवळपास ३ लाखाच्या आसपास पोहचली असून नव्याने वाघोली येथे १५ ऑगस्ट पासून नवीन पोलीस ठाणे सुरू होणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे.

त्यातच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी धडाकेबाज अधिकारी दिल्याची पोलीस दलात चर्चा आहे. सामाजिक सलोखा हद्दीत निर्माण करून गोर गरीबांना न्याय मिळवून देण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार गजानन पवार यांच्याकडून विश्वजित काईगडे यांनी स्वीकारला आहे. गजानन पवार यांना गुलाबपुष्प वर्षाव करून त्यांच्या वाहनाला सर्व कर्मचाऱ्यांनी ओढून आदरपूर्वक निरोप पवार यांना दिला.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी त्यांचे २ वर्षाच्या कालावधीत लोणीकंद, वाघोली परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढत २७ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई, २ आरोपींवर MPDA अंतर्गत कारवाई व १२ आरोपींवर तडीपार कारवाई केली आहे.