पाकिस्तान महिला अँकर कडून भारतीय गोलंदाजांचे कौतुक

नवी दिल्ली – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात क्रिकेट कसोटी मालिका सुरु आहे. नुकत्याच दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळविला. पाच दिवस चाललेल्या या सामन्यात भारताचा गोलंदाज मोहमद सिराजने आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांना वेड लावले आहे. लॉर्ड्स कसोटीनंतर सिराजची देश-विदेशात बरीच चर्चा होत आहे.

त्याने माजी कर्णधार कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानचे क्रीडा पत्रकारही सिराजच्या कामगिरीचे आणि गोलंदाजीचे कौतुक करत आहेत. यात पाकिस्तानची क्रीडा अँकर झैनाब अब्बासनेही आपल्या यूट्यूब चॅनेलवर सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. ‘

सिराज हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे , त्याची गोलंदाजीची शैली वेगळी आहे, त्याने ऑस्ट्रेलियामध्येही अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याने अनेक विकेट्स घेतल्या. आता तो इंग्लंडमध्येही चमकदार गोलंदाजी करत आहे. सिराजकडे नियंत्रणाने गोलंदाजी करण्याची प्रतिभा आहे, असे झैनाबने आपल्या चॅनेलवर सांगितले.

”दहा वर्षांपूर्वी भारताकडे असे वेगवान गोलंदाज नव्हते. भारताकडे आता उत्कृष्ट गोलंदाज आहेत, जे आता या संघाला पूर्वीच्या संघापेक्षा वेगळे बनवतात. भारतीय संघ आता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक संघ आहे, परदेशी भूमीवर कसोटी सामने जिंकण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे अशीही झैनब म्हणाली.

याव्यतिरिक्त लॉर्ड्स कसोटीत सिराजने आठ बळी घेतले. आतापर्यंत सिराजने 7 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर 27 बळी आहेत. इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्ट रोजी खेळविण्यात येणार आहे.