प्रत्येक जिल्हा परिषद गटात 50 लाखांची कामे मंजूर करा

विशेष सभेत सदस्यांची एकजूट; विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी
सातारा –
प्रत्येक जिल्हा परिषद गटात सुमारे 50 लाख रुपयांचे कामे मंजूर करा, अशी एकमुखी मागणी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत केली. या सभेत विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून हा आराखडा आता अंतिम मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेची विशेष सभा शुक्रवारी छत्रपती शिवाजी सभागृहात अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आराखडा सभागृहासमोर ठेवण्यात आला. आराखडा मंजूर करताना प्रत्येक जिल्हा परिषद गटात सुमारे 50 लाखांची कामे मंजूर व्हावीत, यासाठी सदस्यांनी एकजूट दाखवली.

राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता असल्याने भरीव निधी जिल्हा परिषदेला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सदस्यांनी केले. या चर्चेत ज्येष्ठ सदस्य भीमराव काका पाटील, मानसिंगराव जगदाळे, ऍड. उदयसिंह पाटील, दीपक पवार, मंगेश धुमाळ, बापूसाहेब जाधव, सागर शिवदास, धैर्यशील अनपट आदी सदस्यांनी सहभाग घेतला. या सभेत सर्व विभागांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला.

हा आराखडा आता जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात येणार असून जिल्हा परिषदेला किती निधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
खासगी शाळांचे 2017 -18 सालचे अनुदान रखडल्याचा मुद्दा सदस्य अरुण गोरे आणि मंगेश धुमाळ यांनी उपस्थित केला. या कालावधीतील सुमारे चार कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून 2018 -19 चे सुमारे 50 प्रस्ताव दाखल झाले आहे. हे प्रस्ताव 15 दिवसांत निकाली काढू, असे स्पष्टीकरण शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांनी दिले. अनुकंपा भरतीचे पुढे काय झाले असा प्रश्‍न सौ. अर्चना देशमुख यांनी उपस्थित केला. या भरतीप्रक्रियेत काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर करायचे काम सुरु आहे.

दि. 15 जानेवारीपर्यंत संबंधितांना नेमणूक पत्र दिली जातील. ज्या उमेदवारांबाबत त्रुटी आहेत त्यांचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण संजीवराजे यांनी दिले. प्रलंबित पाणी योजनांबाबत मानसिंगराव जगदाळे यांनी नाराजी व्यक्त केली. या योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. पाणीपुरवठा योजनांची कामे युध्दपातळीवर सुरु असून ज्याठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगितले.

कुडाळ येथे सुरु असलेले पेयजल योजनेचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार दीपक पवार यांनी केली. कार्यकारी अभियंत्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अनुदानावर देण्यात येणाऱ्या विद्युत पंपाबाबत एकाच ठिकाणाहून खरेदीची अट घालण्यात येत असल्याबाबत विजय पवार यांनी विचारणा केली. पंप कोठूनही घ्या, मात्र तो आयएसआय मार्कचा असावा, असे अध्यक्ष संजीवराजे यांनी सांगितले.

कराड पंचायत समितीचे सदस्य आणि चालकामध्ये झालेल्या वादावादीची चौकशी करण्याचे आदेश संजीवराजे यांनी यावेळी दिले. प्रत्येक तालुक्‍याला मिळणारे शिक्षकदिनाचे अनुदान 25 हजार रुपये करण्याची मागणी उदय कबुले यांनी केली. अनुदान 10 हजारांवरुन 20 हजार करण्याचे सभापती राजेश पवार यांनी जाहीर केले. शालेय कुस्ती स्पर्धा आयोजनाचा उपक्रम चांगला असून अनुदानात वाढ करावी, अशी मागणी कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी केली. सभेस उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

मल्हारपेठ आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षावरुन सभेत खडाजंगी
मल्हारपेठ (ता. पाटण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया डॉ. सुहेल शिकलगार आणि डॉ. कांबळे यांनी केली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या महिलेला पुन्हा त्रास सुरु झाला. ही शस्त्रक्रिया करताना संबंधित डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य बापूसाहेब जाधव यांनी केला. या विषयात हस्तक्षेप करताना पाटण विकास आघाडीचे सदस्य विजय पवार यांनी संबंधित डॉक्‍टरांचा यामध्ये काहीही दोष नसून त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका घेतली. पवार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. बापूसाहेब जाधव, मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ, धैर्यशील अनपट यांनी आक्रमक भूमिका घेत सदस्य विजय पवार यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. यावेळी सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. संजीवराजे यांनीही विजय पवार यांना तुम्ही सदस्य आहात, जिल्हा आरोग्य अधिकारी खुलासा करतील, असे सांगितले. या प्रकाराची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना संजीवराजे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment