एअर बॅग खरंच उपयोगी आहे का? समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघाताने प्रवाशांचे बळी

राजेंद्र भुजबळ

शिर्डी – समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी व प्रवासासाठी वरदान ठरला, तरी या महामार्गाहून प्रवास करताना वेळेची बचत होते. मात्र, जीवाची जोखीम कोणीही घेत नाही हे अनेक अपघातानंतर समोर आले आहे. अशाही परिस्थितीत अनेक वाहनांमध्ये सुरक्षा कवच दिले आहे ते म्हणजेच एअर बॅग! ही एअर बॅग खरंच अपघातप्रसंगी प्रवाशांचे जीव वाचवते का? हा प्रश्‍न सोमवारी सिन्नरजवळ झालेल्या अपघातानंतर समोर आला आहे.

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा ठरवून दिलेली असूनसुद्धा अनेक वाहनचालक ती न पाळता 150, 160च्या वेगाने जीवघेणा प्रवास करतात. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू झालेला राज्यातील सर्वांत मोठ्या या महामार्गावर अनेक भीषण अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताची कारणे आणि त्यावर सादर केलेले अहवाल यामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन, सीटबेल्टचा वापर न करणे ही महत्त्वाची कारणे असली, तरी काही घटना मात्र आचंबित करणाऱ्या आहेत.

सोमवारी सिन्नरजवळ झालेल्या अपघातात टोयाटो कंपनीची इनोव्हा गाडी होती. तिच्यामध्ये चार एअर बॅग होत्या. मात्र, या गाडीचा अपघात झाला त्या वेळी या एअर बॅग उघडूनही त्या वाहनातील एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, त्या गाडीतली सुरक्षा कवच अर्थात एअर बॅग फुटून गाडीमध्ये जागेवरच तीन जणांचा मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातानंतर एकच प्रश्‍न उभा राहिला असून, अनेक कंपन्यांनी चारचाकी वाहनांमध्ये दिलेले सुरक्षा कवच अर्थात एअर बॅग हे अपघातावेळी खरंच उपयोगी ठरते का? याचं उत्तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञच देऊ शकतात. उत्तर काहीही असले, तरी समृद्धी महामार्ग प्रशासनाने हा प्रश्‍न गंभीररीत्या अभ्यासपूर्वक मार्गदर्शन करणे जरूरीचे आहे. कारण या महामार्गावर दररोज लाखो वाहने व प्रवासी प्रवास करत असून, अनेकांना सुरक्षेविषयी व वेगमर्यादा याविषयी टोल नाक्‍यावर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

या मार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना वाढत असल्याने प्रवास करताना काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर अनेकांचा निष्पापांचा बळी गेला आहे. “चारचाकी वाहनांच्या सर्व कंपन्यांनी एअर बॅगचा उपयोग कसा होतो, त्यासाठी वेगमर्यादा किती असावी, सीटबेल्ट, प्रवासी संख्या हे सर्व वाहन खरेदीवेळी ग्राहकांना समजावून सांगणे सक्तीचे करावे. जेणेकरून भविष्यात अपघात टाळण्यासाठी ते उपयोगी ठरेल”, अशी मागणी सतीश गंगवाल यांनी केली आहे.