सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तरप्रदेशातील कॉग्रेस नेते नाराज ?

नवी दिल्ली – ‘ऑल इज वेल दॅट एंड्स वेल’ या म्हणीनुसार सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी आघाडी निश्चित केली असली तरी, हा शेवट काँग्रेससाठी सध्या तरी फारसा आनंददायी नाही. यूपीत सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तरप्रदेशातील कॉग्रेस नेते हायकमांडवर नाराज झाले आहेत. अशात कॉग्रेसपुढे राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचे संकट निर्माण झाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा? असा प्रश्न ही नेते मंडळी करीत आहेत.

महत्वाचा मुद्या असा की, यूपीतील कॉग्रेसचे नेते ज्या जागांवर लढण्याची तयारी करीत होते त्या जागा कॉग्रेसला देण्यास सपाने नकार दिला आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. यातील कॉग्रेस 17 आणि सपा 62 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवाय एक जागा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, कॉग्रेसला ज्या 17 जागा मिळालेल्या आहेत त्या जागांवर कॉग्रेस कुणाला उभे करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारण, कॉग्रेस नेत्यांचे परंपरागत मतदारसंघ सपाच्या वाट्याला गेल्या आहेत. कॉग्रेसचे स्थानिक नेत्यांनी निवडक जागा आपल्याकडे ठेवण्याची अट मांडण्याची मागणी हायकमांड केली होती. परंतु, सपाच्या दबावतंत्रापुढे कॉग्रेस नेत्यांचे काहीही चालले नाही.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची बलिया किंवा घोसी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. कारण ते ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भूमिहार समाजाचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. काँग्रेसनेही तसा प्रस्ताव दिला होता, पण सपाने ही जागा कॉग्रेससाठी सोडली नाही. किंबहुना, कॉग्रेसला आपल्या प्रदेशाध्यक्षासाठी सुध्दा एक जागा मिळविता आली नाही.

याशिवाय फर्रुखाबादची जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, फैजाबादचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मल खत्री, रामपूरच्या माजी खासदार बेगम नूर बानो, लखनौचे माजी खासदार राज बब्बर आणि भदोहीचे माजी खासदार राजेश मिश्रा यांच्यासाठी मागितली जात होती. सपाने यापैकी एकही जागा काँग्रेसला दिली नाही.

सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तरप्रदेशातील कॉग्रेस नेते नाराज
राजेश मिश्रा यांनी देखील एक्स वर पोस्ट केले आणि लिहिले की पक्षाप्रती समर्पण आणि नेतृत्वावरील निष्ठा यापेक्षा चाटुकारिता जास्त भारी पडली आहे. यावरून बड्या नेत्यांची नाराजी दिसून येते. आता प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना वाराणसीच्या जागेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अनिच्छेने लढावे लागणार असल्याचे मानले जात आहे. राज बब्बर यांना गाझियाबाद किंवा फतेहपूर सिक्री येथून उमेदवारी दिली जाऊ शकते, परंतु इतर नेत्यांसाठी एकही जागा दिसत नाही.