“शेतकऱ्यांसोबत आहात की मोदींसोबत..” कॉंग्रेसचा जयंत चौधरी यांना सवाल

नवी दिल्ली – विरोधी पक्षांची इंडिया आघाडी सोडून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे जाणारे राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्यावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागीणी नायक यांनी जोरदार टीका केली आहे. चौधरी शेतकऱ्यांच्या सोबत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत असा सवाल त्यांनी विचारला आहे.

चौधरी चरणसिंह यांचा वारसा जयंत चौधरी यांनी कमकुवत केला आहे. चरणसिंह आज जिवंत असते तर त्यांनी भारतरत्नपेक्षा अन्नदाते शेतकऱ्यांना अधिक महत्व दिले असते. जयंत यांनी एनडीएची वाट पकडल्यामुळे शेतकऱ्यांचे मनाधैर्य नक्कीच कमी झाले आहे. मात्र जयंत चौधरी साडेसातशे शेतकऱ्यांचे बलिदान कसे विसरले? बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याप्रमाणे जयंत चौधरी यांच्याकडेही आता भविष्यकाळ संशयाने पाहिल अशी टीका नायक यांनी केली.

उत्तर प्रदेशात कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी भक्कम आहे आणि आगामी लोकसभा निवडणूक आम्ही अगदी ताकदीने लढणार आहोत. जयंत चौधरी यांच्या जाण्यामुळे आम्हाला फार फरक पडणार नाही. दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय लोकदलाला एकही जागा जिंकता आली नाही. यावेळेच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा भोपळाच असणार आहे. त्यांचा प्रभाव असलेल्या पश्‍चिम उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे नुकसान होणार नाही. अखिलेश यादव यांच्यासोबत लढत आम्ही उत्तर प्रदेशात चांगले यश मिळवू असेही रागीणी नायक म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या मोदी यांची गॅरंटी ही साफ खोटी आहे. एकीकडे जनरल डायर तर दुसरीकडे देश चालवणारे कायर अशी आक्षेपार्ह टिप्पणीही त्यांनी केली. त्या म्हणाल्या की भाजपचा दहा वर्षांचा कार्यकाळ हा अन्यायाचा काळ आहे. जेंव्हा यूपीएचे सरकार होते तेंव्हा भाजप टीका करायची की महंगाई डायन खाय जात है, मात्र आज त्यांच्या राजवटीत महागाई डार्लिंग झाली आहे. निशस्त्र शेतकऱ्यांवर अश्रू धुराचे गोळे, रबराच्या गोळ्या चालवल्या जात आहेत. देशात प्रचंड बेरोजगारी वाढली असल्याचा दावा करत त्यांनी याबाबतची आकडेवारीही समोर मांडली.